माकडांना पळवून लाविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढविली अशी शक्कल 

Harvesting of crops by monkeys
Harvesting of crops by monkeys

कळंबा (कोल्हापूर) - सकाळच्या प्रहरी हलगी कडाडली जात आहे. हवेत लाठीकाठी फिरवली जाऊ लागली आहे. आरोळीने परिसर दणाणून सोडला आहे. फटाक्‍यांची आतिषबाजी होऊ लागली आहे. हे कोणत्या कार्यक्रमातील अथवा समारंभातील दृश्‍य नव्हे तर रब्बी पिकांचा फडशा पाडणाऱ्या वानराच्या कळपाला पिटाळून लावण्यासाठी कळंब्यातील शेतकऱ्यांनी लढवलेली शक्कल आहे. तसेच पक्ष्यांच्या थव्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेक शेतकरी गोपनीने दगड भिरकावत असल्याचे चित्र दिसत आहे. 

यंदा अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. याचा खरिपातील पिकांनाही मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पिकाने शेतकऱ्यांना तारले आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कळंबा कात्यायनी परिसरामध्ये 74 हेक्‍टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकांची लागवड केली आहे. उत्तम दर्जाची बी-बियाणे, खते ,कीटकनाशके, ठिबक सिंचन योजना, 200 पेक्षा जास्त विहिरी ,कूपनलिका त्यामधील पाणीसाठ्याची श्रीमंती त्यामुळे कळंब्यातील रब्बी पिकांचा तुरा पोटरीला येऊ लागला आहे. मात्र दहा ते पंधरा वानरांचे कळप पिकात शिरून उभी पिके फस्त करीत आहे. तसेच अनेक शेती मधील ज्वारी, मका यांची कणसे मोडून टाकत आहे तर गव्हाच्या पिकाची नासधूस करत आहे. त्याचबरोबर आंतरपीकातील कांदा, भाजीपाला व अनेक प्रकारचे कडधान्य यांची कवळी रोपे व हरभरा वानराचे कळप खाऊन टाकत आहेत. तसेच घरावरील कौलारू, पत्र्याचे छत, छोटे पथदिवे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची ऊस पिके हातातून गेल्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच भर म्हणून वानरांनी धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वानराच्या कळपाला पिटाळून लावण्यासाठी पहाटेच्या प्रहरी पासून सायंकाळपर्यंत शेतकरी पिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक युक्ती लढवत असल्याचे चित्र दिसत आहे. 

दरम्यान वन विभागाने या वानरांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

वानरांचा कळप शेतकऱ्यांच्या अंगावर 
वानराच्या कळपाला पळवून लावण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे. पण अनेक वानरे चित्कारत शेतकऱ्यांच्या दिशेने धावून जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेआहे . पक्षी हंगाम सुरू झाल्यामुळे कळंबा कात्यायनी परिसरातील शेतीमध्ये पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे शेतकरी गोपने दगड भिरकावून पक्ष्यांना हुसकावून लावत आहे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com