खूशखबर! आमदारांच्या निधीत झाली तब्बल एवढी वाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

पवार यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनाही खूष करताना त्यांच्या निधीत वर्षाला एक कोटी रूपयांची वाढ केली आहे.

कोल्हापूर - राज्यातील आमदारांचा वार्षिक विकास निधी दोन कोटीवरून तीन कोटी करण्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांच्या घोषणेमुळे कोल्हापुरात वर्षाला 11 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे तर पाच वर्षात 55 कोटी रूपयांचा वाढीव निधी मिळणार आहे. निधीत झालेल्या वाढीमुळे आमदारांसह त्यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांतही उत्साह आहे. 

हे पण वाचा - विना खर्च लग्न करायचे आहे, मग येथे अर्ज करा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला. शेतकरी, शेतमजूर, उद्योजकांसह सामान्य नागरिकांना दिलासा देताना श्री. पवार यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनाही खूष करताना त्यांच्या निधीत वर्षाला एक कोटी रूपयांची वाढ केली आहे. 2011 पर्यंत हा निधी प्रत्येकी दीड कोटी रूपये होता. 2011 च्या अर्थसंकल्पात श्री. पवार हेच अर्थमंत्री असताना यात 50 लाख रूपयांची वाढ करून तो दोन कोटी रूपये करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून आमदारांच्या निधीत वाढ करावी अशी मागणी होत होती, सद्याच्या निधीत विकास कामे करताना मर्यादा येत असल्याने हा निधी किमान तीन कोटी करावा अशी मागणी आमदारांनी उचलून धरली होती. त्यामुळे अर्थमंत्री पवार यांनी त्यात एक कोटींची वाढ करून हा निधी 3 कोटी रूपये केला आहे. 

हे पण वाचा -  बेळगाव विमानतळावर कोरोनाची धास्ती 

जिल्ह्यात विधानसभेचे दहा तर विधानपरिषदेचे एक आमदार आहेत. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त आहे तर शिक्षक मतदार संघाचे कार्यक्षेत्र हे पाच जिल्ह्यात असल्याने त्यांच्या निधीत झालेल्या वाढीतून कोल्हापुरला किती निधी मिळणार हे अनिश्‍चित आहे. तथापि विधानसभेचे दहा आणि विधानपरिषदेच्या एका आमदारांचा विकास निधी जिल्ह्यातच खर्च होणार आहेत. यापूर्वी या 11 आमदारांचा मिळून वर्षाला 22 कोटीचा निधी कोल्हापुरला मिळत होता. आता त्यात वाढ झाल्याने तो 33 कोटी रूपये होणार आहे. तर पाच वर्षात जिल्ह्याला आमदारांच्या निधीतून तब्बल 165 कोटी रूपयांचा निधी विकासासाठी मिळणार आहेत. पूर्वी पाच वर्षात 110 कोटीचा निधी मिळत होता. यातून मतदार संघात समाज मंदिर बांधणे, रस्ते, गटर्स, मैदानांचा विकास आदि कारणांसाठी हा निधी खर्च होणार आहे. 

दृष्टीक्षेपात आमदार निधी 
एकूण विधानसभेचे आमदार - 10 
विधानपरिषद आमदार - 1 
सद्या मिळणारा वार्षिक निधी - 22 कोटी 
वाढीव मिळणारा वार्षिक निधी - 33 कोटी 
पाच वर्षात मिळणारा वाढीव निधी - 55 कोटी 
पाच वर्षात मिळणारा एकूण निधी - 165 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increment in MLA fund