ब्रेकिंग - पूरबाधित शेतकऱ्यांना केडीसीसी 71 टक्‍के करणार कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शेतकऱ्यांना 71 टक्के पुढील हंगामाचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शेतकऱ्यांना 71 टक्के पुढील हंगामाचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. उर्वरित 29 टक्के रक्कम शासनाकडून  जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात  वर्ग केली जाणार आहे . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी .माने यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

कोल्हापूर ,सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी शासनाने जाहीर केली होती.   बाधित क्षेत्राचे पंचनामे महसूल विभागामार्फत होऊन पंचनामाप्रमाणे कमाल एक हेक्‍टर क्षेत्राकरिता रुपये 95000 म्हणजेच प्रति गुंठ्याला रुपये 950 (ऊस पिकासाठी) अशी माफीची रक्कम निश्चित केली होती. त्यानुसार जिल्हा बँकेकडून 80, 491 सभासदांचे 238 .16 कोटी रुपयांच्या लाभाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते . त्यापैकी 71 टक्के प्रमाणे होणारी  रुपये 167.97  कोटी इतकी रक्कम सरकारने संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्याला वर्ग केलेली आहे. उर्वरित 29 टक्के याप्रमाणे होणारी रुपये 70.19  कोटी रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त व्हावयाची आहे .

 हेही वाचा- बापरे : गर्दी कशी महा गर्दी सांगलीत नियम धाब्यावर...

याबाबत मंगळवारी दि 17 मार्च 2020 रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार, जलसंपदामंत्री नामदार ज यंत पाटील, सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पूर बाधित शेतकऱ्यांची शिल्लक 29 टक्के रक्कम तातडीने द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करता येईल, अशी आग्रही मागणी केलेली आहे. .

हेही वाचा- महत्वाचे...महापालिका क्षेत्रात येथे  मिळणार भाजीपाला -
मात्र , कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदीमुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे .  त्यामुळे बँकेने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 71% इतपत पुढील हंगामाचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उर्वरित 29 टक्के रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर बँक  त्यानुसार कर्ज वाटप करणार आहे . तरी त्याप्रमाणे संस्थांनी डीमांड पत्रके बँकेकडे सादर करावीत, अशा सूचनाही या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KDCC will lend 71% to Loan disbursement in farmers kolhapur marathi news