कोल्हापूरचे दूध पोहोचले थेट गुजरातला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

किमान सहा महिने खराब होणार नाही असे दूध या पॅकमधून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे

कोल्हापूर - पारंपारीक गुणवत्तेला आधुनिकतेची जोड देत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादित केलेल्या "सिलेक्‍ट ट्रेट्रापॅक' दूध आजपासून गुजरामधील हिंम्मतनगर व अहमदाबाद मधील रिलायन्स मॉलमध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्य देत "गोकुळ' ला पसंती दिली असून, गोकुळ दूधाची गुणवत्ता व स्वाद अखेर गुजरात मध्ये पोहचला आहे. 

सहा महिन्यापूर्वी "गोकुळ' ने टेट्रापॅक दुधाची निर्मिती संघाच्या गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्पात सुरू केली आहे. किमान सहा महिने खराब होणार नाही असे दूध या पॅकमधून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. जिल्ह्यातील वारणा दूध संघानंतर राज्यात काही मोजक्‍या खासगी दूध संघानंतर "गोकुळ' ने हे उत्पादन बाजारात आणले आहे. महाराष्ट्रात या दुधाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परदेशातही हे दूध पाठवण्याचे नियोजन आहे. 

आता स्थानिक बाजारपेठेतील "अमुल' च्या वर्चस्वाला शह देत "गोकुळ'ने आपली नेहमीची मागणी स्थिर ठेवत आज गुजरातमध्ये प्रवेश केला.

कोल्हापूरच्या कसदार मातीतील सकस हिरव्या वैरणीबरोबर पशुखाद्याचे विविध प्रकार जनावराच्या आहारात असलेने "गोकुळ' च्या दूधाला एक वेगळा स्वाद व गुणवत्ता आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागीरी, सांगली बरोबर गोव्यातील ग्राहक सुद्धा "गोकुळ' च्या दूधाला प्राधान्य देतात. 

हे पण वाचाकोल्हापूरचा राज्यात डंका ; सीसीटीएनएसमध्ये अव्वल

यासंदर्भात माहिती देताना गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे म्हणाले,"अतिरीक्‍त दूधाचे रूपांतर करण्यासाठी होणा-या खर्चास व त्यातून होणारा तोटा कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त बाजारपेठा काबीज करणे गरजेचे आहे. तसेच अलिकडील काही कालावधीतच भारताच्या संपूर्ण प्रमुख शहरामध्ये गोकुळ दूध उपलब्ध करून दिले जाईल. याचे सर्व श्रेय दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वितरक, व कर्मचारी यांना जाते.' 

हे पण वाचा -  बाप रे! पहिला विवाह झाला असतानाही संपत्तीसाठी बनली चक्क मृत व्यक्तीची पत्नी

 

                      
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur gokul milk entry in gujarat market