१९ व्या शतकात लक्ष्मीसेन महाराजांनी ६१ हजार रुपये खर्च करून कोल्हापुरात बांधली 'ही' इमारत

kolhapur heritage jain matha information by uday gaikwad
kolhapur heritage jain matha information by uday gaikwad

 कोल्हापूर : इसवी सनाच्या आधी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून कोल्हापूर परिसरात जैन धर्मीयांचे वास्तव्य आहे. क्षुल्लकपूर हे कोल्हापूरचे १०-११व्या शतकातील नाव शिलाहराच्या शिलालेखात दिसते. पुढे पद्मपूर, पद्मालय असे कोल्हापूरचे नाव असलेले उल्लेख जैन साहित्यात आढळतात. मौर्य, सातवाहनापासून चालुक्‍य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा राजवटींचा काळ कोल्हापूरने अनुभवण्याबरोबरच वारसा असणारी मंदिरे कायम ठेवली आहेत. त्या परंपरेतील जैन मठाची वास्तू ही महत्त्वाचा वारसा म्हणून जपल्याने एका धर्माच्या मूल्यांची, संस्कृतीशी कोल्हापूरचे नाते अधिक बळकट झाले.
 

गंगावेशीतून पंचगंगा नदीकडे जाताना धर्मशाळेपासून म्हणजेच अलीकडच्या पंचगंगा हॉस्पिटलपासून उजवीकडे जाणारा रस्ता थेट मठामध्ये जातो. जुन्या राजवाड्याप्रमाणे भव्य नगारखान्याची इमारत आहे. त्यावर चारही बाजूला मनोरे आहेत. हेच मठाचे प्रवेशद्वार असून, १९.८१ मीटर उंच आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात मठाधिपती लक्ष्मीसेन महाराजांनी ६१ हजार रुपये खर्च करून ही इमारत बांधली. या इमारतीला लागूनच उत्तरेला एक दुमजली जुनी इमारत असून, त्याला भक्कम लाकडी दरवाजा आहे. मठाधिपतींचे वास्तव्य याच इमारतीत असून, नगारखाण्याच्या व इतर इमारतीमधील खोल्या मठ म्हणून वापरात होत्या. अलीकडे या इमारतींचे स्वरूप पूर्णतः बदलून टाकले असून, सिमेंट काँक्रिटमध्ये अत्याधुनिक इमारतींनी वारसा मूल्य पूर्णतः संपुष्टात आणले आहे.

समोर स्तंभ आणि त्यामागे मंदिर आहे. मात्र, त्याला नव्याने दुसरा मजला बांधून त्याचे मूळ सौंदर्य गमावले आहे. इतर दोन मंदिरे आहेत. पार्श्‍वनाथाची नऊ मीटर उंचीची संगमरवरी मूर्ती 
उभारली आहे.मूर्ती भव्य आणि देखणी असली तरी त्या सभोवती उभारलेला काँक्रिटचा मंडप व जिना हा मूर्तीचे सौंदर्य नाहीसे करणारा ठरतो. अजूनही या मंडप मठाचा जुनेपणा आणि सौंदर्य साधर्म्य जपणे शक्‍य आहे.


लक्ष्मीसेन महाराजांच्या पीठाने संस्कृती विस्तार, विकास, संरक्षण, प्रसार, धर्मग्रंथ निर्मिती, पाठशाळा, मूर्ती स्थापना, तसेच सिद्धांत शास्त्रे, आगम, व्याकरण, न्याय, आयुर्वेद, विज्ञान, गणित, ज्योतिष विषयातील ग्रंथ निर्मिती करण्यात मोठे योगदान दिले. ४०० ताडपत्रीवरील, ४१० कागदावरील, हस्तलिखिते प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश, तमिळ, कन्नड भाषेत असून, ते अप्रकाशित आहेत. इतर पाच हजार ग्रंथ इथे विविध भाषांतील आहेत.
वास्तूचे वारसा मूल्य नाहीसे होऊ नये, हे लक्षात घेऊन संरक्षण, संवर्धनासाठी तारतम्य बाळगलेच पाहिजे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com