धक्कादायक ; येथे पोलिसच शोधत आहेत बनावट पोलिस 

kolhapur police searching for fake police
kolhapur police searching for fake police

कोल्हापूर : एल.सी.बी.चे प्रमुख म्हणजे जिल्ह्यातली मोठी पोस्ट. एलसीबी म्हटलं की बराच दबदबा. पण एल.सी.बी पोलिस म्हणून बनावटगिरी करणाऱ्या एका टोळीच्याच शोधात जुना राजवाडा पोलिस आहेत. अर्थात या टोळीतला इन्स्पेक्‍टर बनावट आहे. एलसीबीच्या दबदब्याचा गैर वापर करत, या बनावट टोळीने कोल्हापुरात अनेक तरुणांना लुटले आहे. एलसीबीचा इन्स्पेक्‍टर असा रुबाब करणारा हा तथाकथित बनावट अधिकारी या प्रकरणात फरारी झाला आहे. आणि जुना राजवाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

प्रथम दर्शनी पोलिस किंवा पोलिस अधिकारीच भासण्यासारखा या टोळीचा एकूण वावर आहे. स्लिम शर्ट, इन शर्ट, फौजी टाईप केसाचा कट, चेहऱ्यावर राकट पणा आणि सगळे वागणे-बोलणे साध्या गणवेशात असलेल्या पोलीस सारखेच. यामुळे या बनावट पोलिसांच्या टोळीने अनेकांना लुटले असल्याचा संशय आहे. या टोळीचा खबऱ्या म्हणून काम करणारा आता पोलिसांच्या ताब्यात आहे, पण आता खऱ्या पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार, हे ध्यानात आल्याने या बनावट पोलिसांच्या खबऱ्यालाही त्यांची खबर अद्याप लागली नाही, अशी परिस्थिती आहे. 

बनावट पोलिस हा प्रकार कोल्हापुरात तसा नवा नाही. पण ज्या पद्धतीने तरुणांना हेरून कारवाईची भीती घालून, वारंवार पैसे उकळण्याचा प्रकार खूप गंभीर आहे. कोल्हापुरात काही महाविद्यालयीन तरुणांना महाविद्यालयाच्या दारात रुबाब करण्याची हौस आहे. आणि या टोळीने त्यांना बरोबर हेरून आपली कमाई करून घेतली आहे. यापूर्वी मंगळवार पेठेतील राजु खांडेकर या तरुणाचा अशाच प्रकारात खून झाला होता. याप्रकरणात वारे वसाहतीतील एका गुंडाला जन्मठेप ही झाली होती. विवेकानंद कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर अशीच शाहूपुरीतली एक टोळी पैसेवाल्या तरुणांना हेरुन त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळत होती. हे तरुण घाबरून घरात व पोलिसातही तक्रार करत नव्हते. घरातल्या पैशाची चोरीकरून किंवा उसनेपासने करून हे तरुण या गुंडांना पैसे देत होते. आणि या पैशाच्या जोरावर ही टोळी आपला रुबाब करत असे. 

आता अशाच स्वरूपाची लूट करणारी एक टोळी उघड झाली आहे. आणि या टोळीने पोलीस असल्याचा मुखवटा घातला आहे. त्या मुखवटे आडून त्यांनी तरुणांना लुटले आहे. आपण पोलीस दिसावे म्हणून त्यांनी साध्या वेशातील पोलिस सारखाच आपला वावर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या तरुणाला उचलून केली जाणारी पैसे वसुलीची भाषाही हुबेहूब आहे. याशिवाय पोलीस भासण्यासाठी तशाच गाडीचा वापर आहे. पुढच्या सीटवर तथाकथित इन्स्पेक्‍टर त्यानंतर मागच्या सीटवर दोघे तिघे पोलीस आणि ज्या तरुणाला लुटायचे आहे. त्या तरुणाला निर्जन स्थळावर न नेता पोलिस मुख्यालया समोरूनच फिरवत त्यांनीही लूट केली आहे. मोक्का लावण्याची भीतीही दाखवली आहे. त्यामुळे आपण पोलिस असल्याचे त्यांनी संबंधितावर पक्के ठसवले आहे. आणि बऱ्यापैकी रक्कमही उकळली आहे. 

कोल्हापुरातल्या काही महाविद्यालयासमोर वडिलांच्या पैशाच्या जोरावर रुबाब करणाऱ्या तरुणांना पाहता लुटण्यासाठी अशी कुळे शोधणे बनावट टोळीला सहज शक्‍य झाले आहे. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांची पथके या बनावट पोलिसांच्या मागावर आहेत. सगळी टोळी सापडली तर लुटमार करणाऱ्या टोळीचा नवा फंडा उघड होणार आहे. 

 
संशयितांच्या बारकाव्यांवर लक्ष 
बनावट पोलिसांची ही टोळी साधीसुधी नाही, असा पोलिसांचा अंदाज आहे. यातील एक आरोपी गारगोटी येथील सेक्‍स रॅकेट मधला आरोपी आहे. या टोळीचे कोल्हापुरातील काही वजनदार मंडळींशी संबंध असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध ठिकाणे, संशयीत व्यक्ती किंवा पोलिसांचे एवढे बारकावे, या आरोपींना कसे माहीत यावर तपासाच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com