कोल्हापूरला पर्यटनाला येताय हे माहीत आहे का...?

संभाजी गंडमाळे 
Wednesday, 27 January 2021

विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना जिल्ह्यातील स्थानिक प्रेक्षणीय स्थळे फिरून पाहण्यासाठी एसटी सोयीची ठरते. मात्र

कोल्हापूर : कोल्हापूर म्हंटल की  तांबडा-पांढरा  ही ओळख मटण. खायच तर कोल्हापूरलाच. पण केवळ  खाद्य पदार्थतच नाही तर  हिरवेगार जंगल आहे, निसर्गाची मुक्त उधळण येथे आहे. कोकणाला जाऊन भिडणारे सहा नागमोडी वळणाचे घाट आहेत. वाघांपासून ते हत्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गड-किल्ले आहेत. प्राचीन शिल्पकलेचे वैभव सांगणारी मंदिरे आहेत.  दाजीपूर, चंदगड, आजरा, आंबा, विशाळगड, उदगिरी परिसरात घनदाट जंगल आहे. असे एक ना अनेक ठिकाणे पाहायच असेल तर या कोल्हापूर भेटीला. येथे आल्यावर काय पाहाल घ्या जाणून...

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, टाऊन हॉल, न्यू पॅलेस, शहाजी छत्रपती म्युझियम, चंद्रकांत मांडरे कलादालन, कणेरी मठ, पन्हाळा, गगनबावडा, दाजीपूर- राधानगरी अभयारण्य, नृसिंहवाडी, खिद्रापूर आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांना खुणावू लागली आहेत. लॉकडाउननंतर आता पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने एकूणच अर्थकारणाला चालना मिळू लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे, की तेथे हिरवेगार जंगल आहे, निसर्गाची मुक्त उधळण येथे आहे. कोकणाला जाऊन भिडणारे सहा नागमोडी वळणाचे घाट आहेत. वाघांपासून ते हत्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गड-किल्ले आहेत. प्राचीन शिल्पकलेचे वैभव सांगणारी मंदिरे आहेत. खाद्यसंस्कृतीत वैविध्य आहे. दाजीपूर, चंदगड, आजरा, आंबा, विशाळगड, उदगिरी परिसरात घनदाट जंगल आहे. दाजीपूरला तर गवा अभयारण्य आहे. 

शहराचाच विचार केला तर टाऊन हॉलमधील कोल्हापूर वस्तुसंग्रहालय म्हणजे येथे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात. टाऊन हॉलशेजारीच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात हरिजन समाजासाठी सिद्धार्थनगर वसवले. याच परिसरातील नर्सरी बागेत शाहू-लक्ष्मी प्रार्थना मंदिर समाधिस्थळाच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जायचे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ ऑक्‍टोबर १९३२ रोजी येथे भेट दिली होती. याच परिसरात आपली समाधी असावी, अशी राजर्षी छत्रपती शाहूंची इच्छा होती. त्यानुसार नर्सरी बाग परिसरात महापालिकेने राजर्षी शाहू समाधिस्थळ साकारले आहे. 

कोल्हापूर चित्रनगरीही आता विविध अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होत असून येथे चित्रीकरणाला प्रारंभ झाला आहे. शहरापासून केवळ बारा किलोमीटरवर कणेरी मठ असून परिसरात आता सिद्धगिरी दिव्य गार्डन साकारले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित फुलझाडांची कलात्मक रचना येथे असून ऋषीगोपूरम, सप्तर्षी मंडपम, देव-देवतांची गार्डन, पाचशेहून अधिक प्रतिकृती येथे आहेत. फुलांनी नटलेले प्रतीकात्मक मनोरे येथे असून सहा एकरात वसलेले देशातील हे पहिले व्हर्टिकल गार्डन आहे. 

 तांबडा-पांढरा अन्‌ गूळही... 
कोल्हापुरी तांबडा-पांढरा, झणझणीत कोल्हापुरी मिसळपासून ते कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साजही पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व सराफ कट्ट्यासह चप्पल लाईनही सज्ज आहे. कोल्हापुरी गूळ व काकवीलाही मागणी वाढली आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसराबरोबरच मंदिरापासून केवळ दहा ते वीस मिनिटांच्या अंतरावर शहरातील विविध ठिकाणी या गोष्टी मिळतात. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. त्याशिवाय कोकण आणि गोव्यालाही येथून बस उपलब्ध आहेत. महालक्ष्मी धर्मशाळेबरोबरच यात्री निवास आणि हॉटेलही सज्ज झाली आहेत.

 ‘हॉटेल ब्रॅंड कोल्हापूर’ची भुरळ
शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांत मोठे हॉटेल ब्रॅंड आले आहेत. यामुळे हॉटेल उद्योगक्षेत्रात सकारात्मक बदल झाले, तसेच जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळाली. देशात पर्यटन व्यवसाय विस्तारत आहे. राज्यातही परदेशी पर्यटकांची संख्या वाढते आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरांमध्ये येणारे हॉटेल्समधील मोठे ब्रॅंड जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरू लागले आहेत. 
कोल्हापूरला हॉटेल व्यवसायाची परंपरा जुनी आहे. आलिशान हॉटेल आणि दर्जेदार सुविधा हे इथल्या हॉटेल व्यावसायिकांचे वैशिष्ट्य आहे. गेल्या पाच वर्षांत इथे हॉटेल व्यवसायातील नामांकित आणि प्रसिद्ध ब्रॅंड्‌स आलेत. एक प्रकारची सकारात्मक स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे इथल्या हॉटेल क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. राज्यात विस्तारणाऱ्या उद्योग क्षेत्राला आता दक्षिण महाराष्ट्रात विस्तारासाठी अनेक संधी आहेत. विमानतळ, रेल्वे आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत यामुळे कोल्हापुरात भविष्यात सर्वच प्रकारच्या उद्योगक्षेत्रांना संधी निर्माण होणार आहे. म्हणूच काळाची पावले ओळखून या नामांकित ब्रॅंडनी कोल्हापूरमध्ये आपला विस्तार केला आहे.

या ब्रॅंडची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते इथल्या प्रसिद्ध हॉटेल बरोबर करार करतात. हॉटेलच्या मालकाला भागीदार बनवून हॉटेलचे व्यवस्थापन स्वतः पाहतात. हॉटेलमधील स्टाफपासून मेनूपर्यंत सर्व काही ते नव्याने ठरवतात. प्रत्येकाचा करार हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. आपल्या हॉटेलमध्ये अधिक ग्राहक यावेत यासाठी ते देशभर कोल्हापूर आणि येथील पर्यटनाची जाहिरात करतात. विविध प्रदर्शनांमध्ये कोल्हापूरला प्रसिद्धी देण्यासाठी उपक्रम राबवतात. या ब्रॅंड्‌सची दखल घेउन परराज्यातील पर्यटकही कोल्हापूरकडे आकर्षित होतात.

 कोल्हापूर दर्शन सेवा...
विविध भागांतून आलेल्या पर्यटकांना जिल्ह्यातील स्थानिक प्रेक्षणीय स्थळे फिरून पाहण्यासाठी एसटी सोयीची ठरते. मात्र एसटीची कोल्हापूर दर्शन सेवा बंद असल्याने पर्यटकांना खासगी गाड्या घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाची कोल्हापूर दर्शन ही खास बससेवा सुरू करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

‘कोल्हापूर दर्शन’ घडविणारी एसटी बससेवा यापूर्वी होती. मात्र बहुतेक वेळा बसस्थानकावरून सकाळी आठ वाजता बस सुटत होती. दिवसभर कोल्हापूर दर्शन घडवत होती. त्याची फारशी माहिती पर्यटकांना नव्हती. प्रतिसादीअभावी ही सेवा बंद पडली. मात्र, एसटीच्या पर्यटन सुविधेला प्रवासी प्रतिसाद चांगला मिळू शकतो. तसे प्रयत्न एसटी महामंडळ करीत आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे-महाबळेश्‍वर दर्शन, अष्टविनायक दर्शन या दोन्ही सेवा पुण्यात सुरू झाल्या आहेत. असाच प्रयोग कोल्हापुरात व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. दरम्यान, काही खासगी संस्थांनी अशी सुविधा सुरू केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur tourist information story by sambhaji gandmale kolhapur marathi news torisim news