esakal | सर्वसामान्यांना आता फोडणीही झोंबणार ; खाद्यतेलाचे दरही चढेच राहणार

बोलून बातमी शोधा

oil of home use price increase in market in kolhapur}

एकंदरीतच सर्वसामान्यांना महागाईच्या झळांनी होरपळण्यास सुरवात झाली आहे.

सर्वसामान्यांना आता फोडणीही झोंबणार ; खाद्यतेलाचे दरही चढेच राहणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. जोपर्यंत आयात कर कमी होत नाही तोपर्यंत हे दर वाढीवच राहण्याची शक्‍यता आहे. दोन महिन्यांत खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर वीस रुपयांनी वाढले आहेत. गॅस सिलिंडर, पेट्रोल - डिझेल दर वाढलेले असतानाच आता खाद्यतेलानेही महागाईत तेल ओतले आहे. एकंदरीतच सर्वसामान्यांना महागाईच्या झळांनी होरपळण्यास सुरवात झाली आहे.

प्रत्येक स्वयंपाकघरात खाद्यतेलाशिवाय पर्याय नाही. थेट फोडणीला महागाईची झळ पोचली आहे. शेंगतेल, सूर्यफूल आणि सरकी तेल अशा सर्वच प्रकारात दरवाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीबद्दल व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्यामुळे त्याची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोचली आहे. विशेष करून हवामानाचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम थेट चुलीपर्यंत पोचला आहे. चीनमध्येही गतवर्षी पाऊस आणि महापुरासारखी परस्थिती झाल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा केला आहे. तसेच उत्पादनही कमी झाले आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

हेही वाचा - महापालिका निवडणूका आणखी लांबणीवर? -

अमेरिकेसह अन्य देशांतून तेल आयात केले जाते, मलेशियातून पाम तेल आयात केले जाते. सध्या आयात शुल्कसुद्धा ४०-४५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे त्याचाही फटका दरवाढीसाठी बसला आहे. परिणामी शेंगतेल १८५ रुपये, सूर्यफूल तेल १३८ रुपये आणि सरकी तेल १३२ रुपये लिटरपर्यंत 
पोचले आहे. दोन महिन्यांपूर्वीपेक्षा आता दरात तब्बल वीस रुपयांची वाढ प्रति लिटर झाली आहे. यामुळे तेलाच्या डब्यांचीही रक्कम थेट शंभरीच्या पटीत वाढली आहे.

"आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलाढाल आणि आयात शुल्कामुळेच खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. अद्याप परिस्थिती स्थिर असल्यामुळे काही दिवस तेलाचे दर असेच राहणार आहेत. उत्तर भारतातील मोहरीचे पीक बाजारात आल्यानंतर काही प्रमाणात दर कमी होऊ शकतील. तसेच आयात शुल्क कमी केल्यास खाद्यतेलाचे दर कमी होऊ शकतील. हा निर्णय केंद्र शासनाने घेणे अपेक्षित आहे."

- हरीश कापडिया, तेल व्यापारी

संपादन - स्नेहल कदम