Janta curfew : 'भावा कुठे निघालास? काय काम आहे तुझे...?

संदिप खांडेकर
रविवार, 22 मार्च 2020

एखाद-दुसरे दुचाकी व‌ चारचाकी वाहन रस्त्यावर, चौकात दिसताच पोलिसांकडून ते अडवले जात होते. वाहन चालकाला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना नाकीनऊ येत होते. 

कोल्हापूर : 'भावा कुठे निघालास? काय काम आहे तुझे? आज जनता कर्फ्यू आहे हे तुला माहीत नाही का?,' अशी प्रश्नांची सरबत्ती करत रस्त्यावर दिसणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना पोलिसांनी चांगलेच खडे बोल सुनावले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिक सहभागी होत असताना 'तुम्ही रस्त्यावर का?,' या प्रश्नाचे उत्तर देताना वाहनधारकांची बोबडी चांगलीच वळली.

हेही वाचा- ब्रेकिंग :दहावीची परीक्षा पुढे ढकलली, एप्रिलच्या या आठवड्यात होणार परीक्षा...

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आजच्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. रस्त्यावर किंबहुना घराबाहेर पडणेही त्यांनी टाळले. हे चित्र एकीकडे असताना एखाद-दुसरे दुचाकी व‌ चारचाकी वाहन रस्त्यावर, चौकात दिसताच पोलिसांकडून ते अडवले जात होते. वाहन चालकाला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना नाकीनऊ येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुन्हा घरी जाऊन थांबण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात येत होती.

तुम्ही रस्त्यावर का ?

हेही वाचा- Photo : जगात भारी आम्ही कोल्हापुरी... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...

तुला माहीत नाही का?
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा-सागर हॉटेल चौक, आर. के. नगर नाका परिसरात चोख पोलिस बंदोबस्त होता. आर. के.‌ नगर नाका ‌परिसरात दुचाकी वाहनधारकाला पोलिसांनी अडवून त्याची चौकशी केली. नातेवाईक रुग्णालयात असल्याने त्यांच्या भेटीसाठी जात असल्याचे सांगताच त्याला पोलिसांनी जाण्याची परवानगी दिली. इंदिरा-सागर हॉटेल चौकातही पोलिसांचा ठिय्या होता. चौकात आलेल्या दुचाकीस्वारांना त्यांनी पुन्हा घरी परतण्याची सूचना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police Speak up janta curfew on kolhapur marathi news