ग्राहकांनो वीज बिल भरा आता हप्त्या हप्त्याने

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

सध्याच्या आकारणीसाठी तीन, तर थकीत रकमेसाठी १२ हप्ते

कोल्हापूर : लॉकडाउन काळातील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन तर याच कालावधीतील थकीत वीज बिलांची रक्कम भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. तरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये आर्थिक संकट ओढवले. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिले हप्त्याने भरण्याची सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महावितरणने कोरोना 

काळातील ग्राहकांना सध्याचे वीज बिल तीन तर या आधीचे थकीत वीज बिल भरण्यासाठी १२ हप्त्याची सवलत योजना सुरू केली आहे. त्यासोबतच तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी पुर्नजोडणीसाठी वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी परतफेड योजना किंवा हप्त्यात वीज बिल भरण्याची विशेष सवलत योजना सुरू केली आहे. 
थकबाकीतील ५० टक्के व्याज माफी

एकरकमी परतफेड योजना 

तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकबाकीवरील व्याजात ५० टक्के सूट व वीजपुरवठा खंडित कालावधीतील डिमांड आकारणी माफ होणार आहे. यासाठी ग्राहकांना १०० टक्के मूळ थकबाकी व दंडाच्या रक्कमेसह थकबाकीवरील व्याजाची ५० टक्के रक्कम भरणा करावी लागेल.

हेही वाचा- इचलकरंजी आगार जिल्ह्यात अव्वल -

एकरकमी परतफेड वा पाच समान हप्त्यात भरणा
या योजनेत तात्पुरता वा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांना एकरकमी परतफेड करता येईल किंवा पाच समान हप्त्यात बिल भरण्याची विशेष सवलतीचा लाभ घेता येईल. या योजनेनुसार ग्राहकांनी मुळ थकबाकी, दंड व व्याजासह असलेली वीज देयक थकबाकीची ३० टक्के रक्कम भरणा केल्यास उर्वरीत थकबाकी चालू वीज बिलासह पाच समान हप्त्यात भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र  ग्राहकांना उर्वरीत हप्त्याच्या रक्कमेवर वार्षिक १२ टक्के व्याज आकारणी केली जाईल.

कोल्हापूरचे अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुर्नजोडणी प्रक्रिया
तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना या योजनेत अर्ज मंजुरीनंतर वीज देयक थकबाकीची ३० टक्के रक्कम व पुर्नजोडणी शुल्क भरल्यानंतर वीज जोडणी देण्यात येईल. सहा महिने कालावधीच्या आतील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांना तांत्रिक व्यवहार्यता पडताळणी करून जुन्याच ग्राहक क्रमांकाने वीजजोडणी दिली जाईल. 

 

असा घ्या योजनेचा लाभ 
कृषी ग्राहक वगळून सर्व उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील पात्र वीजग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्राहकांना थकबाकीच्या दोन टक्के रक्कम भरून २०० रुपयांच्या मुद्रांकावर विनाअट सहभागाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना जवळच्या महावितरण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सवलतींची माहिती घेता येईल.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhakar Nirmale Chief Engineer Kolhapur Circle MSEDCL information by papeole