esakal | थरारनाट्य ; दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीला केले जेरबंद,झटापटीत पोलिस जखमी 

बोलून बातमी शोधा

Robbery gang arrested kolhapur rajarampuri police station crime marathi news}

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारीसह मोटार जप्त

थरारनाट्य ; दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीला केले जेरबंद,झटापटीत पोलिस जखमी 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बंगला हेरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाचजणांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. टोळीकडून गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे असलेले मॅगझीन, तलवार, मोटारीसह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर चौकात मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या थरारनाट्यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला. 
पोलिसांनी या प्रकरणी अजिंक्‍य मनोहर भोपळे (वय २८, रा. वाशी नवी मुंबई, मूळ रा. चोकाक, हातकणंगले), जयवंत सर्जेराव साळवे (३६), दीपक जनार्दन आडगळे (३०, दोघे रा. कोपर्डी, हवेली), अनिल आनंदा वायदंडे (४९, रा. बनवडी), वैभव दादासाहेब हजारे (२६, बनवडे फाटा, ता. कराड) अशी आहेत. 

नियोजनबद्ध व थरारक कारवाई...
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी महेश पोवार यांना मंगळवारी (ता. २) एक टोळी चंदेरी मोटारीतून दरोडा टाकण्यासाठी शहरात येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक समाधान घुगे यांना कळविले. त्याच रात्री पोवार यांना मोटार इंदिरासागर चौकातून हॉकी स्टेडियम मार्गे सायबर चौकाकडे येणार असल्याची माहिती मिळाली. तिचा शोध घेण्यासाठी ते व सुरेश काळे मोटारसायकलवरून या मार्गावर गस्त घालत होते.

सायबर चौकात उपनिरीक्षक घुगे व त्यांच्या पथकाने सापळा लावून ठेवला होता. रिंगरोडवर संबंधित मोटार पोवार व काळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिला सायबर चौकात गाठले. सायबर चौकात मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वळण घेऊन एनसीसी भवनकडेच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडी अडवून तिला घेरले आणि झडप घालून मोटारीतील पाच जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस पोवार जखमी झाले.

हेही वाचा- पंचवीस वर्षापूर्वी ही फिल्म थेट सभागृहात! वीस तासांची फिल्म तयार केली ५६ मिनिटांची

प्राथमिक चौकशीत संशयितांनी त्याची नावे अजिंक्‍य भोपळे, जयवंत साळवे, दीपक आडगळे, अनिल वायंदडे, वैभव हजारे असल्याचे सांगितले. अजिंक्‍यच्या कमरेला लावलेली गावठी पिस्तूल व चार जिवंत राऊंड ताब्यात घेतले. संशयितांकडून दोन तलवारी, दोरी, दोन बॅटऱ्या, मोबाईल, सहा हजार ४०० रुपयांच्या रोकडसह मोटार असा सात लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी कारागृहातून बाहेर पडलेल्या एकाची भेट घेतली होती. त्याचा जवाहनगरातील एका बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न होता. अशी माहिती तपासात पुढे आली. त्या सर्वांना न्यायालयाने सहा मार्चपर्यंत कोठडी सुनावली. ही कारवाई उपनिरीक्षक समाधान घुगे, कर्मचारी महेश पोवार, सुरेश काळे, भूषण ठाणेकर, उत्तम माने, युक्ती ठोंबरे, सचिन देसाई व सुशांत तळप यांनी केली, असे शहर पोलिस उप अधीक्षक मंगेश चव्हाण व पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. 

हेही वाचा- पोलिसांवर हल्ला करून आरोपींचे पलायन; थरारक पाठलाग करून आवळल्या मुसक्या

पिस्तुलाबाबतचा तपास सुरू
संशयितांनी पिस्तूल कोठून खरेदी केले, त्याचा यापूर्वी आणखी काही गुन्ह्यांत वापर केला का, याची माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. संशयित अजिंक्‍यला स्फोट घडविल्याप्रकरणी चार वर्षांची शिक्षाही झाली होती. त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. संशयित साळवेवरही मारामारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याची शहानिशा पोलिस करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे