शिवाजी विद्यापीठाचा गुरुवारी दीक्षांत समारंभ; हे आहेत प्रमुख पाहुणे

 Shivaji University inauguration ceremony on Thursday
Shivaji University inauguration ceremony on Thursday

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षांत समारंभ गुरुवारी (ता. 6) होणार आहे. नवीदिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे तर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, ग्रंथ महोत्सव समन्वयक डॉ. नमिता खोत आदी उपस्थित होते. 

दरम्यान, यंदा पदवीधर होणाऱ्या साठ हजार 167 स्नातकांपैकी 32 हजारांवर मुलींचा समावेश असून उच्च शिक्षणात पदवीधर होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात यंदाच्या सोहळ्यात सर्वाधिक पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य, मॅनेजमेंट, व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठ प्रांगणात दोन हजार 65 स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे दिली जातील. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयीन स्तरावरील पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांमध्येच देण्यात येणार आहेत. ही संख्या 35 हजार 668 इतकी आहे. महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र कार्यक्रमात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्याच्या सूचना प्रशासनाने प्राचार्यांना दिल्या असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. पोस्टाने पदवी प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या स्नातकांची संख्या 22 हजार 434 असून यापैकी दहा हजार 244 मुले तर बारा हजार 190 मुले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासशाखेतून पदवी घेणाऱ्यांची संख्या 29 हजार 236, वाणिज्य व व्यवस्थापन विषयातून 14 हजार 640, मानव्यशास्त्र विषयातून 14 हजार 645 तर आंतरविद्या शाखेतून सोळाशे शेहेचाळीस इतके विद्यार्थी पदवी घेणार आहेत. 

10 स्नातकांना पीएच.डी. 
दीक्षांत सोहळ्यात एकूण तीनशे दहा स्नातकांना पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार असून प्रत्यक्ष व्यासपीठावर फक्त 43 स्नातकांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण होईल. यावेळी दोन सुवर्णपदकांसह सोळा विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके दिली जातील. बुधवारी (ता. 5) सकाळी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोर ग्रंथ महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. गुरुवारी (ता.6) सकाळी आठ ते साडेनऊ ग्रंथ दिंडी आणि पाऊणे अकरा ते सव्वा बारा या वेळेत मुख्य दीक्षांत सोहळा होईल. 

दृष्टिक्षेपात दीक्षांत सोहळा... 
बुधवारी (ता. 5) ः सकाळी दहा वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्‌घाटन. त्यानंतर साडेअकरा वाजता संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा "गीत बहार' हा कार्यक्रम. ग्रंथ महोत्सवात भारतीय व परदेशी कंपनीचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथांचेतीसहून अधिक स्टॉलचा समावेश असेल. सलग दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव सर्वांसाठी खुला असेल. 
0 गुरूवारी (ता. 6) ः सकाळी साडेसातला कमला कॉलेज येथून ग्रंथ दिंडीला प्रारंभ. साडेनऊला दीक्षांत सभा मंडपात दिंडीची सांगता. सकाळी पाऊणे अकराला मुख्य दीक्षांत सोहळ्याला प्रारंभ. 

शिवाजी विद्यापीठांतर्गत परीक्षांच्या तारखा जाहीर 
शिवाजी विद्यापीठांतर्गत मार्च आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या प्रारंभ तारखांबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना पाठवले आहे. परीक्षा अर्ज सादर करण्यापासून ते बैठक व्यवस्थेसंदर्भातील सर्व सूचना यातून देण्यात आल्या आहेत. 27 मार्चपासून परीक्षांना प्रारंभ होणार असून विविध अभ्यासक्रमाच्या सहाशे ऐंशी परीक्षा या सत्रामध्ये होणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू झाली असून विनाविलंब शुल्कसह अर्ज सादर करण्याची मुदत 17 फेब्रुवारी, विलंब शुल्कासह 24 फेब्रुवारी आमि अतिविलंब शुल्कासह 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com