
कोल्हापूर : तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्ण ठेवलेल्या रुग्णालयांत काम करता म्हणून गर्भवती असणाऱ्या दोन महिलांना आपले राहते घर सोडावे लागले. खानावळीतील चौघांसाठी येणारे जेवणही बंद केले. बागेत गेलो तर आम्हाला पाहून कामगार पळून जात होते. पण, लक्षात ठेवा कोरोना झालेल्या बहीण-भावांवर जी वेळ आली, ती तुमच्या-आमच्यावरही येऊ शकते.
त्यामुळे, भक्तिपूजानगरमधील दोन्ही कोरोनाग्रस्त बहीण-भाऊ ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना लवकरच घरी सोडले जाईल. त्यामुळे त्यांची आरती ओवाळून स्वागत करा, त्यांना धीर द्या आणि तुम्ही काळजी घ्या, कारण सामाजिक बहिष्कार हा कोरोनापेक्षाही महाभयंकर आहे, असे आवाहन अथायू हॉस्पिटलमध्ये दोन बहीण-भावांवर कुटुंबाप्रमाणे उपचार आणि काळजी घेणारे अथायू हॉस्पिटलचे "सीईओ' डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंग अधीक्षिका शीतल मोपकर, असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर राहुल खोत आणि अपघात विभाग अधीक्षक विजय महापुरे यांनी आज केले.
अथायू'मधील देवदूतांनी दिला मदतीा हात
जिल्ह्यात 26 मार्चला कोल्हापुरातील पहिला रुग्ण आढळला. त्यांच्यावर उपचार करायचे कोठे, हाच मोठा प्रश्न होता. दरम्यान, "अथायू'च्या प्रशासनाने निर्णय घेऊन या रुग्णांना "अथायू'मध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला. जगभर आणि देशात कोरोना म्हणजे मृत्यू असेच वातावरण असताना "अथायू'मधील देवदूतांनी या रुग्णाला कोरोनावर मात करण्याचे बळ दिले. यातच त्यांच्या बहिणीलाही कोरोना झाल्याचा अहवाल आला आणि सर्वांनाच हादरा बसला. याच अथायू हॉस्पिटलमधील सीईओ डॉ. पुराणिक, नर्सिंग अधीक्षिका मोपकर, असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर खोत आणि अपघात विभाग अधिक्षक महापुरे व त्यांच्या सर्व टीमने त्यांना उपचार देण्याचे आव्हान स्वीकारले.
दोन्ही रुग्णांना सकाळी नाश्ता, दूध-हळद, मध तसेच आक्रोडसह साधा आणि पौष्टिक आहार दिला. घरच्यासारखी वागणूक देत उपचार केले. पण, दुसरीकडे या रुग्णालयात काम करणाऱ्या आणि गर्भवती असणाऱ्या दोन महिलांना भाड्याने राहत असलेल्या खोल्या सोडाव्या लागल्या. तर, काहींचे घरगुती खानावळीतून येणारे जेवण बंद केले.
या चौघांपैकी एकजरी व्यक्ती बागेत किंवा बाहेरील वॉर्डमध्ये दिसला तर तेथील कर्मचारी पळून जात होते. बागेत गेल्यावर बागेतील काम सोडून बाहेर जाऊन थांबणारे कर्मचारीही या देवदूतांनी पाहिले. आता दोघेही बरे झाले आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या सर्वांना कोरोना बरा होऊ शकतो, याचा आत्मविश्वास आहे. आता डिस्चार्ज झाल्यावर हे दोघेही ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे. आजपर्यंत त्यांना जिव्हाळ्याने आणि आपुलकीने वागणूक दिली. तीच वागणूक रुग्णालयातून घरी आल्यावर दिली पाहिजे.
वेळ आपल्यावरही येवू शकते
ब्रिटिश पंतप्रधान असो किंवा आणखी कोण, कोरोना कोणाला होईल हे सांगता येत नाही. पण, जे भाऊ-बहीण आता बरे झाले आहेत, रुग्णालयातून घरी आल्यावर संबंधित सोसायटीत त्यांचे स्वागत करून त्यांना ताकद दिली पाहिजे. ही वेळ आहे. आज या भाऊ-बहिणींवर आलेली वेळ आपल्यावरही येवू शकते. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा उभारी दिली जावे.
- डॉ. सतीश पुराणिक, सीईओ, अथायू हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.