उदगाव नाक्‍यावर दोन तास रास्ता रोको

गणेश शिंदे
Friday, 6 November 2020

केंद्राच्या कृषी विधेयकासह शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोलनाक्‍यावर गुरुवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

जयसिंगपूर : केंद्राच्या कृषी विधेयकासह शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोलनाक्‍यावर गुरुवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानीचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कृषी विधेयक रद्द झालेच पाहिजे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचा, यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेट्टी म्हणाले, ""कृषी विधेयकांच्या विरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. ही तीन विधेयके समजून घेणे गरजेचे आहे. विधेयकांचा करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना यात यायचे आहे. यामध्ये सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.

जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशा परिस्थितीत शेती पाय रोवून उभे आहे. देशाचा जीडीपी वजा 23 टक्के इतका खाली गेला असताना शेती क्षेत्राचा जीडीपी 3 टक्के अधिक आहे. देशातील उद्योगपतींना शेतीतील पैसा दिसायला लागल्याने हे शेतकरीविरोधी धोरण राबविण्यात येत आहे. देशात करार शेतीचा एकही प्रयोग यशस्वी झालेला नाही. त्यामुळे हे मंजूर केलेले कायदे मागे घ्यावेत.'' 

शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. या वेळी पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, मन्सूर मुल्लाणी, तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, शैलेश आडके, सागर शंभुशेट्टे, विश्‍वास बालिघाटे, सागर मादनाईक, शैलेश चौगुले, विठ्ठल मोरे, ऋतुराज सावंत देसाई, प्रकाश बंडगर, जवाहर चौगुले, शंकर नाळे, अण्णासाहेब चौगुले, बंडू कोडोले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

देशभरात रास्ता रोको
सरकार हे आंदोलन फक्त पंजाब व हरियाना राज्यात आहे, असे चित्र निर्माण करीत आहे. मात्र, अखिल भारतीय किसान समन्वय समितीतर्फे देशभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर या विधेयकांच्या विरोधात येत्या 26 व 27 नोव्हेंबरला दिल्लीला भव्य मोर्चा आहे. 
- राजू शेट्टी, माजी खासदार 

 

संपादन - सचिंन  चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop For Two Hours At Udagaon Naka Kolhapur Marathi News