टी लव्हर्स कोल्हापूरकर...! 

 Tea lovers kolhapur
Tea lovers kolhapur

कोल्हापूर - कॉलेज कॅम्पस असो किंवा सार्वजनिक ठिकाणी वाफाळणारा चहा आणि त्याबरोबर रंगणारा गप्पांचा फड म्हणजे तरूणाईचा हक्काचा ठिय्या. पण, बदलत्या काळात आता चहाचेच इतके प्रकार आले आहेत, की देशभरातील पंचवीसहून अधिक ब्रॅंडचा चहा आता शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध झाला आहे. टी हाऊस, टी कट्टा अशा विविध नावांनी विविध चहाच्या फ्रॅंचाईजी सुरू झाल्या असून केवळ तरूणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील "टी लव्हर्स'चा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

दरम्यान, चहाची सवय वाईट असते, असा काहींचा समज असला तरी या प्रत्येक ब्रॅंडने आपल्या वैशिष्ट्यांचे प्रमोशन करताना चहा आरोग्यदायी कसा आहे, हे सांगण्यावर अधिक भर दिला आहे. अनेक ठिकाणी स्वागताला उभी असलेली मिकीमाऊस, छोटा भीम अशी कार्टुन पात्रेही लक्षवेधी ठरत आहेत. 

असे आहेत ब्रॅंड... 
रावजी, पंढरपुरी चाय, शेठजी चाय, येवले चहा, हर्बल टी, आईस टी, टी केटली, हरमन टी, मोरया चहा, प्रेमाचा चहा, आपुलकीचा चहा, सुप्रसिध्द, सलगर अमृततुल्य, करवीर अमृततुल्य, फौजी चहा असे चहाचे विविध ब्रॅंड आणि फ्रॅंचाईजी शहरात सुरू आहेत. ही यादी अपडेट करायची म्हंटलं तरी एखादे नाव विसरून जाईल, असे सध्याचे चित्र आहे. प्रत्येक ब्रॅंडने तरूणाईला साद घालताना फेसबुक पेजीसच्या माध्यमातून नेटवर्कींग वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आकर्षक टिझर आणि "चलो चाय के साथ थोडी वफा की जाए...जिंदगी की सारी चिंताए दा दी जाए...', "तुमची तृप्ती हास आमचा ध्यास', "बातोंकी मिठास लबोंकी प्याली, अपनी तो मेहबूबा चायवाली' अशा विविध टॅगलाईनचाही वापर केला आहे. येत्या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आणखी काही फ्रॅंचाईजी शहरात सुरू होणार असून त्याच्या प्रमोशनला सोशल मीडियावर प्रारंभ झाला आहे. 

आजवर हेल्पर, रिक्षा-ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर अशी कामं केली. पण, स्वतःचा व्यवसाय असावा, असे मनोमन वाटायचे. भाऊ रवींद्र यांनी प्रोत्साहन दिले आणि पाच ते सहा विविध पदार्थ वापरून स्वतःचा "रावजी' हा चहाचा ब्रॅंड विकसित केला. कसबा बावडा रस्त्यावर व्यवसाय सुरू केला आणि वर्षभरात राज्यभरात 48 ठिकाणी आता या चहाच्या फ्रॅंचाईजी दिल्या आहेत. या ब्रॅंडला आयएसओ मानांकनही मिळाले आहे. 
- संभाजी हराळे

"पंढरपुरी चाय' हा पुण्याच्या ब्रॅंड आहे. आम्ही दीड महिन्यापासून त्याची फ्रॅंचाईजी घेतली असून शिवाजी उद्यमनगरात व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जलविरहित, पित्तविरहित चहा, सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि आयुर्वेदीक घटक ही आमच्या चहाची वैशिष्ट्ये आहेत. विविध पार्टी, ऑफिसेस व सोसायटी मीटिंग अशा विविध कार्यक्रमांसाठी आर्डरही आम्ही घेतो. 
- अजय ढोले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com