छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, मंत्री वडेट्टीवारांनी केला माझ्या बोलण्याचा विपर्यास 

CHRAPATI.jpg
CHRAPATI.jpg


सोलापूरः तुळजापूर येथील मराठा आरक्षण मेळाव्यात तरुणांना शांत करण्यासाठी केलेल्या प्रासंगिक विधानाचा कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विपर्यास केला आहे. प्रत्यक्षात आपण सकल बहुजन समाजाच्या हिताच्या संरक्षणाची भूमिका पूर्वीपासून घेतल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत दिली. 

येथील बालाजी सरोवर हॉटेलच्या सभागृहात त्यांची आज पत्रकार परिषद झाली. आम्ही अर्धी तलवार म्यानातून बाहेर काढली असल्याची आक्रमक भूमिका मराठा तरुणांनी तुळजापूर येथील आरक्षणाच्या कार्यक्रमात मांडली. त्यावेळी त्या परिस्थितीत तरुणांना शांत करण्यासाठी आपण तलवार काढण्याची गरज नाही, वेळ पडलीच तर मी तलवार काढतो असे सांगितल्याची स्पष्टोक्ती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तेथील परिस्थिती शांत करण्यासाठी दिलेल्या वक्तव्यांचा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी विपर्यास केला. त्यानंतर कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही विपर्यास करत छत्रपती त्यांची तलवार ओबीसी व दलितांवर उगारणार का? असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात मागील अनेक वर्षापासून आपण अठरा पगड समाज व बारा बलुतेदारांना सामाजिक न्याय देण्याची परंपरा जोपासली आहे. छत्रपती शिवाजी महाराजापासून ते छत्रपती शाहू महाराजापर्यंत असलेली ही परंपरा आजही जोपासत आहोत.त्यामुळे वडेट्टीवार यांचे ते वक्तव्य माझ्या भूमिकेशी विसंगत आहे. 

मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने सिध्द केले आहे. त्याच आधारावर एसईबीसी आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही भूमिका घेतली आहे. कोणत्याही प्रवर्गावर अन्याय करून आरक्षण मिळवण्याची आपली भूमिका पूर्वी नव्हती व आता देखील नाही. आयोगाने काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे होत असलेल्या आरक्षणावर सध्या स्थगिती आली आहे. आपण 2007 पासून सकल बहुजन समाज एकोप्याने राहावा व मराठा समाजाला न्याय मार्गाने आरक्षण मिळावे ही भूमिका मांडत आलो आहोत. कोणत्याही राजकीय गोष्टीच्या पलिकडे जाऊन छत्रपती म्हणून ही व्यापक भूमिका आपण घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाच्या विरोधात बोलण्याचे कारणच नाही. 
दोन छत्रपतींनी आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केल्याबद्दल प्रतिक्रीया देताना शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या वक्तव्याबद्दल मला काही बोलायचे नाही. 
रविवारी (ता.11) रोजी होणाऱ्या एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलावी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पुर्वीच्या परिेक्षेतील 420 जागांच्या नियुक्‍त्याची प्रक्रीया लांबली आहे ती पूर्ण करावी. स्थगितीच्या संदर्भाने ही परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी आपण केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याबाबत योग्य निर्णय घेतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com