दुष्काळात तेरावा..! पेनूर येथे डुकरांचा उच्छाद; शेतातील उभी पिके करताहेत नष्ट

प्रसाद शेटे 
Friday, 18 September 2020

ही डुकरे पेनूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, ऊस, ज्वारी, कांदा, भुईमूग आदी पिके नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित वराहपालकास सूचना केली असता त्याच्याकडून अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. या भागातील शेतकरी निसर्गाने साथ न दिल्याने अगोदरच संकटात आहेत. कसेबसे कर्ज काढून पिकवलेली पिके डुकरे जमीनदोस्त करीत असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. 

पेनूर (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील पेनूर गावात मोकाट फिरणाऱ्या डुकरांनी परिसरात उच्छाद मांडला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांसह शेतकरी हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

हेही वाचा : वडील वीटभट्टीवर काम केले तरच मिळायचं एकवेळचं जेवण, अशा परिस्थितीत मुलाने मंत्रालय सहायकापासून मिळवली चार पदे; आता आहे... 

ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गाव हागणदारीमुक्त केले आहे. मात्र एका वराहपालकाने पेनूर गावात तब्बल दीड हजार डुकरे सोडली आहेत. या डुकरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा व त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ही डुकरे गावात मोकाट फिरत आहेत. लोकांच्या घरांमध्ये घुसणे, सार्वजनिक ठिकाणी घाण होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. 

हेही वाचा : विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पंढरपूरवासीयांनी अनुभवले निसर्गाचे रौद्ररूप ! 

विशेष बाब म्हणजे, ही डुकरे पेनूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, ऊस, ज्वारी, कांदा, भुईमूग आदी पिके नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित वराहपालकास सूचना केली असता त्याच्याकडून अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. या भागातील शेतकरी निसर्गाने साथ न दिल्याने अगोदरच संकटात आहेत. कसेबसे कर्ज काढून पिकवलेली पिके डुकरे जमीनदोस्त करीत असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. 

याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन दिले असून, या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर भारत भोसले, गोवर्धन डोंगरे, सुनील राजगुरू, मारुती डोंगरे, अंकुश गवळी, नागनाथ कुंभार, कैलास माने, अंकुश माने, मोहम्मद पठाण, वाहीदहुसेन पाटील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे पेनूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to field crops by pigs at Penur