सोलापुरी सेलिब्रेशन : मित्राला लागली नोकरी अन्‌ मित्रांनी थेट लावला डिजिटल बोर्ड; पगारही सांगितला ! 

किरण चव्हाण 
Thursday, 3 September 2020

चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या विशालला मोहोळ तालुक्‍यातील आष्टी येथील औदुंबर पाटील साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटरची नोकरी मिळाली व पगारही अगोदरच्या नोकरीपेक्षा अधिक मिळाला. यामुळे विशालबरोबरच त्याचा मित्र परिवारही आनंदी झाला आणि विशालच्या मित्रांनी दारफळ येथील मुख्य चौकात विशालचा फेटा घातलेल्या फोटो झळकवला व नोकरी लागल्याबद्दल अभिनंदन करणारे डिजिटल लावून आनंद साजरा केला. 

माढा (सोलापूर) : दारफळ सीना (ता. माढा) येथील विशाल बारबोले याला कारखान्यात चांगल्या पगाराची नोकरी लागल्याने त्याच्या मित्रांनी दारफळ गावातील चौकातच विशालचा डिजिटल बोर्ड लावून आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे डिजिटल बोर्डवर पगाराची रक्कमही लिहिली असल्याने हा डिजिटल बोर्ड सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक ! ग्राहक सेवा केंद्रातून दहा लाखांचा अपहार; संचालक, सहसंचालकाविरुद्ध गुन्हा 

विशाल बारबोले याला चांगल्या पगाराची नोकरी लागल्याचा आनंद त्याच्या मित्र परिवाराने पगाराच्या रकमेसह डिजिटल लावून अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विशालने आयटीआयचा कोर्स केला आहे. आयटीआयचा कोर्स झाल्यावर त्याने एका कारखान्यात नोकरी केली. पण कमी पगार असल्याने चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या विशालला मोहोळ तालुक्‍यातील आष्टी येथील औदुंबर पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाल्याची माहिती मिळाली. विशालला या कारखान्यात क्रेन ऑपरेटरची नोकरी मिळाली व पगारही अगोदरच्या नोकरीपेक्षा अधिक मिळाल्याने विशालबरोबरच त्याचा मित्र परिवारही आनंदी झाला आणि विशालच्या मित्रांनी दारफळ येथील मुख्य चौकात विशालचा फेटा घातलेल्या फोटो झळकवला व नोकरी लागल्याबद्दल अभिनंदन करणारे डिजिटल लावून आनंद साजरा केला. 

हेही वाचा : कोळा परिसरातील वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई ! 1.40 कोटींचा मुद्देमाल जप्त 

विशेष म्हणजे, या डिजिटलवर विशालला कारखान्यावर मिळाणाऱ्या पगाराचाही ठळकपणे उल्लेख केला आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात नोकरीला खूप महत्त्व आले आहे आणि नोकरी लागताच वैयक्तिक पातळीवर अनेक आनंद उत्सव केले जातात. दारफळ येथील विशालच्या मित्रांनी नोकरी लागल्याच्या या आनंदाला असे सार्वत्रिक रूप देऊन आनंद द्विगुणित केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friends celebrated by putting up digital boards as friend got jobs