प्रपंचासाठी रणरणत्या उन्हात त्यांना करावी लागतेय वणवण

mask new.jpg
mask new.jpg

सोलापूरः संचारबंदी शिथिल काळात पूर्व भागातील गर्दीच्या ठिकाणी दररोज एक ज्येष्ठ, शरीराने सडपातळ मात्र उंच अशी व्यक्ती लोकांच्या नजरेस पडते... हातात कापडी तीन-चार पिशव्या व वीस-पंचवीस साधे कापडी मास्क... पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ग्राहक शोधत फिरत असते... हजारोंमधून काहीजणच मास्कची चौकशी करतात... 20 रुपये दर सांगितले तरी शेवटी पाच रुपयांतही कोणी मास्क खरेदी करण्यास तयार नसतो... सकाळी नऊपासून सुरू झालेली पायपीट अकरा- साडेअकरा वाजता घरी गेल्यावरच थांबते... हातावरील पोटासाठी केलेल्या आटापिटानंतर हातात पडतात किती, तर फक्त 50 ते 60 रुपये..! घरी आल्यावर पुन्हा उद्यासाठी सुरू होते मास्क व पिशव्यांची शिलाई... 

लॉकडाउनमुळे अनेक गरीब कामगार कुटुंबीयांना कमाई नाही, रेशन संपलेले, भाजी व किराणाची महागाई, तिखट-मीठ, तेलासाठीही पदरी पैसा नाही. या कामगाराला मुलांच्या भुकेची चिंताही लागली आहे. पर्यायी रोजगारासाठी अनेकजण मिळेल ते काम करत व दानशूर व्यक्ती व संस्थांच्या दातृत्वाने मिळणाऱ्या धान्यासाठी गल्लोगल्ली फिरून धान्य गोळा करत असल्याचे चित्र पूर्वभागात सर्वत्र दिसून येते. 

या स्थितीतच टॉवेल शिलाई करणारी मात्र सध्या बेरोजगार झालेली पत्नी तसेच एक मुलगा व एका मुलीसाठी कष्ट उपसणारे 65 वर्षीय चंद्रकांत नामाजी. पूर्वभागातील माधवनगर येथे एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतात. चंद्रकांत हे पूर्वी टॉवेल शिलाई करायचे. मात्र नजर कमी झाल्याने बेरोजगार झाले. पत्नीच्या रोजगारावर पाचवी इयत्तेत असलेला मुलगा, दहावीत असलेल्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. मात्र लॉकडाउनमुळे पत्नीही दोन महिन्यांपासून बेरोजगार झाली. मग सुरू झाली नामाजी कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण. घराचे भाडे, धान्य, किराणा साहित्य यासाठी हाती पैसा शिल्लक नाही. पती-पत्नी हताश झालेले. स्वाभिमानामुळे कोणाकडे पदर पसरायची हिंमत होत नाही. मग सुरू झाली स्वाभिमानाने कष्टाचीच भाकर खाण्यासाठीची धडपड. 
चंद्रकांत यांच्या पत्नी कापडाचे तुकडे जोडत मास्क व पिशव्या शिवणार व चंद्रकांत या वस्तू बाजारात जाऊन विकणार... सकाळी नऊ वाजता पूर्वभागातील गर्दीचे ठिकाण जसे भाजी मार्केट, बॅंकांसमोर लागलेल्या रांगा, किराणा व मटनाच्या दुकानांसमोर झालेल्या गर्दीच्या ठिकाणी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मास्क व पिशव्या घेऊन फिरणार. त्यांची चाल इतकी वेगवान, की वाटते की हे चालतात की पळतात! कारणही तसेच आहे, की दोन तासांत त्यांना सर्व बाजारपेठांमध्ये फिरून घरी परतायचे असते. 

मास्कला मिळतात फक्त पाचच रुपये 
मेडिकल व इतर दुकानांमध्ये विविध प्रकारचे मास्क मिळतात. त्यामानाने चंद्रकांत यांच्या मास्कला कोणी विचारत नाही. कारण साध्या कापडाचे व बांधण्यासाठी त्याला इलॅस्टिक (रबर) नव्हे तर कापडाचीच दोरी शिवलेली. इलॅस्टिक खरेदी करण्यासाठी हाती पैसा नाही. त्यामुळे या गरिबाकडील मास्कची खरेदीही एखादी गरीब व्यक्तीच करणार. त्यामुळे मास्कला पाच रुपयेच मिळतात. 

अपुऱ्या कमाईचे करावे काय 
काहीतरी करावं म्हणून साधे मास्क व पिशव्या शिवून विकतो. सांगताना 20 रुपये किंमत सांगतो मात्र पाच रुपयालाही कोणी घेत नाही. कारण कापड भारी नाही, मास्कला इलॅस्टिक नाही. आहे ते सांगतो, कारण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. कसेतरी 50-60 रुपये मिळतात. 
- चंद्रकांत नामाजी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com