शेतमाल सडला, शेतकरी खचला

शेतमाल सडला, शेतकरी खचला

नातेपुते (जि. सोलापूर) : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला शेतमाल जागेवर सडत आहे. अतिवृष्टीने हैराण झालेला शेतकरी आता कुठे सावरत होता, तोपर्यंत या संकटामुळे शेतकरी पूर्ण कोलमडून गेलेला आहे. सध्या द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, टरबूज, पेरू हे फळे शेतकरी कवडीमोल दराने विकत आहेत किंवा जागेवर फेकून देत आहेत. पीक हातात येईपर्यंत केलेला लाखो रुपये खर्च अक्षरशः पाण्यात गेलेला आहे. 

द्राक्ष बागायतदार झाला हवालदिल 
सध्या द्राक्षेचा सीझन सुरू आहे. शेतकऱ्यांकडे माल तयार आहे. दरवर्षी जागेवरून 50 ते 60 रुपये किलो दराने द्राक्षची विक्री होते. मात्र यंदा 15 रुपये दरानेही व्यापारी माल खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झालेला आहे. व्यापारी येत नाहीत. द्राक्षे लवकर खराब होतात. त्यामुळे द्राक्ष नातेवाईक-मित्रमंडळी यांना भेट देणे अथवा जागेवर फेकून देणे याशिवाय पर्याय नाही. लागवडीपासून पहिल्या बहारापर्यंत एकरी पाच ते सहा लाख खर्च येतो. हा खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. 

डाळिंबाच्या नुकसानीने बजेट कोलमडले 
डाळिंबचे वर्षभरात मृग, हस्त, आंबे असे तीन बहार असतात. सध्या आंबे बहारची डाळिंब बागेत आहेत. मार्केट बंद असल्यामुळे व्यापारी येत नाहीत. एकरी साधारण दोन लाख खर्च होतो. तर 10 टन डाळिंब निघतात. निर्यातक्षम माल साधारण 100 रुपयांच्या पुढे विकला जातो. अतिवृष्टीमुळे बहार उशिरा झाले आहेत. वर्षभरात रोगराईचे प्रमाण जास्त असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या बहारावर शेतकऱ्यांचे विशेष लक्ष व पुढील सर्व आर्थिक नियोजन होते. याचा फटका पुढील वर्षभर बसणार आहे. येत्या काही दिवसांत शेतकरी बियाणे, खते खरेदीला महाग असणार आहे. कोरोनाचा पुढील अंदाज नसल्यामुळे मार्केट कधी चालू होईल ते माहीत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पावसाळ्यातील बहार लांबवित आहेत. शेतकऱ्यांना मजुरांना द्यायला पैसे नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. 

तरकारी पिकांमध्ये सोडली गुरे 
एप्रिल-मे हा लग्नसराई काळ असल्याने कमी पाण्यात शेतकरी तरकारी भाजीपाला करण्यावर जास्त भर देतात. या कालावधीत त्याचे पैसे चांगले होतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व तरकारी भाजीपाला तयार होता. परंतु लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांनी अक्षरक्ष: उभ्या पिकात गुरे सोडली आहेत. यामध्ये कारली, शेवगा, पालेभाज्याचा जास्त समावेश आहे. लग्नसराई डोळ्यासमोर ठेवून फुलशेती मोठ्या प्रमाणात होते. सध्या या वातावरणामुळे फुले जागेवर सडत आहेत. 

दोन ते तीन रुपये किलोने केळीची विक्री 
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात केळीचे उत्पन्न चांगले निघाले होते. दरम्यानच्या काळात दरही चांगला होता. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि सरकारने देशभर लॉकडाउन लागू केला. त्यामुळे सर्व चित्रच बदलले आहे. आज कवडीमोल दराने केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दोन ते तीन रुपये किलो दराने व्यापारी केळी घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

टरबूज, कलिंगड कवडीमोल 
टरबूज, कलिंगड ही पिके कमी कालावधीत व कमी श्रमात चांगला पैसा मिळवून देतात. त्यामुळे शेतकरी या पिकांवर उन्हाळ्यात जास्त भर देतात. मात्र सध्या कलिंगड, टरबूज कवडीमोल दराने विकत आहेत. कोरोना कधी संपणार, हे माहीत नाही. मार्केट कधी सुरू होणार, हेही नक्की नाही. या परिसरातील शेतमाल 90 टक्के पुणे, मुंबई मार्केटला जातो. सध्या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव तेथे असल्याने तेथील मार्केट लवकर चालू होईल असे वाटत नाही. मार्केट सुरू असले तरी स्थानिक गाड्या संसर्गाच्या भीतीने तिकडे जायला टाळत आहेत. 

सरकारच्या मदतीवरही शंका 
कोरोनामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. वर्षभराचे पूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. अतिवृष्टीच्या धक्‍क्‍यातून सावरणारा शेतकरी कोरोनाने पुरता घायाळ झाला आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार किती मदत करू शकेल, ही शंकाही शेतकऱ्यांना सतावत आहे. उद्योगधंदे सावरतील. तेथील नाशिवंत माल नसल्यामुळे आजचा उद्या विकला जाईल. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान कशानेही भरून निघणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 


जिल्ह्यात सध्या द्राक्ष सीझन सुरू आहे. दरवर्षी जागेवरून सरासरी 50 ते 60 रुपये किलो दराने माल विक्री होते. यंदा, मात्र 15 रुपये दरानेही कोणी खरेदी करत नाही. व्यापारी येत नसल्याने द्राक्षे लवकर खराब होतात, त्यामुळे भेट देणे अथवा जागेवर फेकून देणे याशिवाय पर्याय नाही. लागवडीपासून पहिल्या बहारापर्यंत एकरी पाच ते सहा लाख खर्च येतो. त्यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झालेला आहे. 
- राहुल जठार, कृषी पंडित पुरस्कारप्राप्त व निर्यातक्षम डाळिंब उत्पादक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com