सोलापुरातील विविध मठ, मंदिरात महाशिवरात्र उत्साहात

Movement in Solapur monastery, Temple Mahasivratri
Movement in Solapur monastery, Temple Mahasivratri

सोलापूर : शहरातील शिवालये व मंदिरांत शुक्रवारी महाशिवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. पहाटेपासूनच शिवभक्तांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. महाभिषेक, महारुद्राभिषेक, सहस्रबिल्वार्चन, सामूहिक पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसादाचे वाटप आदी विविध कार्यक्रम पार पडले. 

मल्लिकार्जुन मंदिर 
बाळी वेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे चारपासून भाविकांच्या उपस्थितीत श्री मल्लिकार्जुन लिंगास रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, बाळासाहेब मुस्तारे व भाविकांच्या उपस्थितीत दुधाचा रुद्राभिषेक करण्यात आला. या वेळी राजशेखर हिरेहब्बू व हिरेहब्बू परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. रात्री 12.30 वाजता दुधाचा अभिषेक करण्यात आला. या वेळी भाविकांसाठी रुद्रशक्ती प्रतिष्ठानतर्फे साबू चिवडा केळी वाटप करण्यात आल्यास. या वेळी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ गिरीश किवडे, संकेत थोबडे, प्रतीक थोबडे, सिद्धेश थोबडे, संस्थापक-अध्यक्ष रोहित अक्कलकोटे, सचिन कोरे, अभिषेक तोग्गी, शरण बिराजदार, आकार कुंदूर, प्रसाद साळुंखे, अभिषेक भोगडे, विनायक अक्कलकोटे, गणेश अक्कलकोटे, स्वप्नील तोग्गी, संकेत भोगडे, धानेश रुगी, योगीराज साबणे आदी उपस्थित होते. 


श्री सिद्धेश्‍वर मंदिर 
श्री सिद्धेश्‍वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे महाभिषेक, रुद्राभिषेकाने महाशिवरात्रोत्सवास सुरवात झाली. योग समाधीला तांदळाची महापूजा करण्यात आली. ॐ नम: शिवायच्या मंत्रोच्चारात 108 बिल्वार्चना झाली. भाविकांना खिचडी, भगरचा प्रसाद देण्यात आला. रात्री शिवलीलामृत पारायण व सामूहिक भजन-कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. 

एसव्हीसीएस मंदिर 
अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मंदिरात महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. 

जय शंकर आश्रम, गुरुनानक नगर 
गुरुनानक नगर येथील जय शंकर आश्रमात होमहवन, प्रवचन, सायंकाळी महाआरती आदी धार्मिक विधी पार पडले. भाविकांना ठंडाई, खिचडी व साबूवडा प्रसाद म्हणून देण्यात आला. रात्रभर जागरण, अभिषेक व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. 

तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेतर्फे दीपोत्सव 
तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेतर्फे नाभिक समाजाचे कुलदैवत श्री चिम्मटेश्वर मंदिरामध्ये सकाळी महारुद्राभिषेक, अभिषेक वाटप, सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रम कार्यक्रम पार पडला. दिवसभर भाविकांना खजूर, द्राक्ष, साबूवडा, केळी, साबू चिवडा प्रसाद म्हणून देण्यात आला. 

बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे कार्यक्रम 
श्री बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे श्री जगद्‌गुरू पंडिताराध्य व विश्‍वाराध्य जयंती तसेच महाशिवरात्र महोत्सव मठाध्यक्ष धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. 

सकाळी सहा वाजता अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरातील पंचमुखी परमेश्वर लिंगास रुद्राभिषेक, रुद्रपूजा, रुद्रपठण, सहस्रबिल्वार्चन, महामंगलारती करण्यात आली. सिद्धेश्‍वर हल्लाळी शास्त्री, चनबसय्या हिरेमठ यांच्यासह मठातील बटूंनी विधिवत पूजा केली. सकाळी सात वाजता बाळी वेस येथील मठात श्री जगदाचार्य मूर्तीस महारुद्राभिषेक, सहस्रबिल्वार्चन, महामंगलारती करण्यात आली. काळी आठ वाजता थोबडे यांच्या वाड्यातून श्री पंडिताराध्य लिंगोद्‌भव मूर्तीचे मठात आगमन झाल्यानंतर रथपूजा करून श्री जगद्‌गुरू पंडिताराध्य व विश्‍वाराध्य मूर्तींच्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. 


बैलजोडी, शंकराची मूर्ती, रेणुकाचार्यांची मूर्ती, जगद्‌गुरू पंडिताराध्य व विश्‍वाराध्यांची प्रतिमा, रथ, श्री वीरतपस्वी पालखी, शिवलिंग व श्री वीरतपस्वींची प्रतिमा, सनई-चौघडा, हलगी, बॅंड पथक आदी वाद्यांसह ही मिरवणूक उत्तर कसबा, होटगी मठ, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, 
मंगळवार पेठ पोलिस चौकी, मन्मथेश्वर मंदिर, कुंभार वेस, सराफ बाजार, मधला मारुती, कोंतम चौक, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट नाका मार्गे निघून एमआयडीसी येथील श्री वीरतपस्वी मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 


मिरवणुकीत संस्थेच्या विविध प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील झेंडा पथक, टिपरी, लेझीम, झांज पथक, धनगरी ढोल, पारंपरिक वेशभूषेतील नृत्य पथक सहभागी होते. 


दुपारी चार वाजता बृहन्मठाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची इष्टलिंग महापूजा पार पडली. पूजेत महांतेश कोरे (शिंगडगाव) परिवाराने सहभाग घेतला. सायंकाळी सात वाजता दीपोत्सव, रात्री नऊ वाजता वीरतपस्वी पालखीचे पूजन करण्यात आले. यानंतर वीरतपस्वी मंदिराच्या प्रांगणातून वीरतपस्वी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री 9.30 वाजता शोभेच्या दारूकामाने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिरात रात्री भजन-कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. 

मिरवणूक मार्गावर मधला मारुती व्यापारी संघटना, गणेश पावसकर, हरिओम विणकर बाग आदी विविध सामाजिक संघटनांनी उपवासाच्या फराळाची व पाण्याची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, 
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com