इसबावीत अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

भारत नागणे 
Thursday, 17 September 2020

मागील काही दिवसांपासून भीमा नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. मागील महिन्यात इसबावी येथे अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत 18 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहराजवळच्या इसबावी येथील भीमा नदी पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात वाळू चोरी विरोधी पथकाने कारवाई केली. कारवाई दरम्यान तीन वाहनांसह दीड ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (ता. 15) रात्री करण्यात आली. पोलिसांनी वाळूसह 18 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हेही वाचा : मुसळधार पावसाने आलेल्या पुरात चालकासह एक कार, दोन मोटारसायकली गेल्या वाहून 

मागील काही दिवसांपासून भीमा नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू उपशा विरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे. मागील महिन्यात इसबावी येथे अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री काही लोक इसबावी येथील नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फिर्यादी पोलिस हवालदार पेट्रोलिंग करत असताना नदी पात्रात जाऊन पाहणी केली असता, काही लोक वाळू उपसा करताना तर यातील काही आरोपी वाहनात वाळू भरताना आढळून आले. त्यानंतर जिल्हा विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. 

हेही वाचा : रेशन दुकानातील धान्यवाटपाचा वाद पोचला ऍट्रॉसिटी व विनयभंगापर्यंत! दोन गटांतील 16 जणांविरुद्ध गुन्हे 

कारवाईमध्ये एक पिकअप (एमएच 13-आर 981) अशोक विना क्रमांकाचे दोन चारचाकी वाहन, अशा तीन वाहनांमधील दीड ब्रास वाळूसह 18 लाख 11 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गणेश सुभाष झाडबुके, उमेश राजू धोत्रे, विजय महादेव देशमुख, शुभम प्रकाश साबळे, प्रकाश ज्ञानेश्वर कांबळे, आकाश सुनील धोत्रे यांच्यासह इतर चार जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कल्याण भोईटे (पोलिस मुख्यालय, ग्रामीण पोलिस विशेष पथक) यांनी पंढपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action against illegal sand dredgers from Bhima river