वाळू माफियांचा वाढतोय मुजोरपणा; "या' तालुक्‍यातील तहसीलदारांना दिली धमकी

Sand Mafia
Sand Mafia

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असताना, याच संकटात उत्पन्नाची नामी संधी समजून शिरजोर झालेल्या वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या समोर दुचाकी आडवी लावून कारवाईपासून रोखण्याचा प्रताप केला. या मुजोरपणामुळे तालुक्‍यामध्ये वाळू माफिया शिरजोर होत असल्याचे दिसून येत आहे. 

अलीकडच्या काळात तालुक्‍यामध्ये वाढलेली बेरोजगारी लक्षात घेता अनेक तरुणांनी कमी काळात जास्त उत्पन्नाची संधी म्हणून अवैध धंद्यांचा आसरा घेतला. यामध्ये बेरोजगार असलेल्या अनेक तरुणांनी सहभाग घेतला. या अवैध व्यवसायांना अप्रत्यक्षरीत्या पोलिसांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांना अधिकच संधी मिळत गेली. त्यामध्ये गुटखा, वाळू, दारू या गोष्टींचा तालुक्‍यात प्रादुर्भाव वाढत गेला. तालुक्‍यातील वाळूची ठिकाणे बंद असल्यामुळे शेजारच्या तालुक्‍यातील वाळू वाहतूक होत असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी नुकतेच मंगळवेढ्यात पत्रकार परिषदेत सांगितले. तरीही पोलिसांनी वाळूवर कारवाई केलेल्या आहेत. 

दरम्यान, कारवाईस गेलेल्या हुलजंतीच्या मंडल अधिकारी व तलाठी यांना थेट सरपंच आणि दोन मुलांनी शिवीगाळ व मारहाण करून त्यांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी संघटनेने तर थेट त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली. यावर तत्काळ लक्ष दिले तरच वाळू माफियांवर वचक निर्माण होऊ शकतो. उपविभागीय अधिकारी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेले असता त्यांनाही अडथळ्यांना सामोरे जावे लागले. दोन दिवसांपूर्वी दस्तुरखुद्द तहसीलदार वाळूवर कारवाईला जात असताना त्यांच्यामध्ये दुचाकी आडवी लावून त्यांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे सध्या कोरोनाच्या संकटात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची चांदी असल्याचे दिसत आहे. अशा व्यवसायांवर मुळापासून कारवाई करण्याची गरज आहे; अन्यथा मंडलाधिकारी यांच्यापासून तहसीलदारांवर धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफिया भविष्यात पोलिसांवरही आपला धाक दाखवण्यास कमी पडणार नाही. त्यासाठी आता यांच्यावर कोण आवर घालणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com