सरपंच निवड जनतेतूनच ! ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

तात्या लांडगे
Saturday, 29 February 2020

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम 

  • अर्ज भरण्याची मुदत : 6 ते 13 मार्च 
  • उमेदवारी अर्जांची छाननी : 16 मार्च 
  • अर्ज माघार घेण्याची मुदत : 18 मार्च 
  • ग्रामपंचायतींसाठी मतदान : 29 मार्च 
  • मतमोजणी अन्‌ निकाल : 30 मार्च 

सोलापूर : राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 6 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान होणार असून 30 मार्चला मतमोजणी, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेतूनच होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : तरुणांनो खुषखबर ! ठाकरे सरकारची एक लाख एक हजार पदांची मेगाभरती 

राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. 24) जाहीर केला. त्यामध्ये ठाणे (13), रायगड (1), रत्नागिरी (8), नाशिक (102), जळगाव (2), नगर (2), नंदुरबार (38), पुणे (6), सातारा (2), कोल्हापूर (4), औरंगाबाद (7), नांदेड (100), अमरावती (526), अकोला (1), यवतमाळ (461), बुलढाणा (1), नागपूर (1), वर्धा (3) आणि गडचिरोली (296) या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 फेब्रुवारीला तहसिलदारांमार्फत निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात आली. दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपापला पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने आघाडीचे सूत ग्रामपंचायत निवडणुकीत जुळलेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावरच स्थानिक गटांद्वारे निवडणूक लढवित असल्याचे चित्र बहूतांश ठिकाणी दिसून येत आहे. 

हेही नक्‍की वाचा : नापासांची पंचाईत ! निकालंतरही मिळेना उत्तरपित्रकेची फोटोकॉपी 

जुलैमध्ये 27 हजार ग्रामपंचायतींचा टप्पा 
एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर जुलै ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या तब्बल 27 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरंपचांची निवड पूर्वीप्रमाणे बहूमताद्वारे केली जाणार आहे. परंतु, एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतूनच निवडले जातील, असे निवडणूक आयोगाच्या 24 फेब्रुवारीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

हेही नक्‍की वाचा : अर्रर्र ! वसुलीसाठी आले नाहीत म्हणून अडविला पगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch selection from the masses Gram Panchayat Election Program Announced