काम नसल्याने ते निराश मनाने परततात

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

पुरणसिंग पणतुवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून लोधी गल्लीच्या रस्त्यावर दुचाकीची सर्व्हिसिंग व दुरुस्तीचे कामे करतात. रस्त्याच्या जवळच असलेल्या भिंतीला लागून थोडेफार सामान ठेवून ते काम करतात. यापूर्वी त्यांची एक टपरी होती पण ती मनपाच्या कारवाईत काढून टाकली.

सोलापूरः गाड्या दुरुस्तीची कमाई संपली व जवळचे पैसे देखील संपले. निदान लॉकडाउनच्या काळात एखादी तरी दुचाकी दुरुस्त करता येईल म्हणून अजूनही भिंतीवरील सामानाजवळ पुरणसिंग पणतुवाले ग्राहकाची वाट पाहत बसतात. काम नाही मिळाले तर घरी खाण्यापिण्याच्या न्यायचे काय असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. 

हेही वाचाः अक्कलकोटमध्ये आजपासून गुरुवारपर्यंत जनता कर्फ्यु 

पुरणसिंग पणतुवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून लोधी गल्लीच्या रस्त्यावर दुचाकीची सर्व्हिसिंग व दुरुस्तीचे कामे करतात. रस्त्याच्या जवळच असलेल्या भिंतीला लागून थोडेफार सामान ठेवून ते काम करतात. यापूर्वी त्यांची एक टपरी होती पण ती मनपाच्या कारवाईत काढून टाकली. तेव्हापासून ते भिंतीवरच सामान ठेवून काम करतात. 
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाउनमुळे त्यांचे काम बंद झाले. लॉकडाउनच्या पूर्वी त्यांना गाडी दुरुस्ती व सर्व्हिसिंगच्या कामातून 200 ते 300 रुपये कमाई होत असे. 

हेही वाचाःमधुमेह, रक्तदाब व किडनी विकाराच्या रुग्णांचे हाल 

मात्र आता कामच बंद पडल्याने त्यांची मोठी अडचण झाली. त्यांच्या कुटुंबात दोन मुले, दोन मुली व पत्नी असा परिवार आहे. हातावरचे काम सुटल्याने जवळ असलेल्या थोड्या पैशावर त्यांनी घर चालवले. त्यांच्या घरातील एक सदस्य दुसरीकडे काम करतात. त्या सदस्यांच्या मालकाने तातडीने महिन्याचा पगार आधी हाती सोपवला. त्या पैशावर कसेबसे घर चालले. आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील त्यांना जादा उत्पन्न गटाचे केसरी रेशन कार्ड दिले गेले. त्या कार्डावर धान्य 12 रुपये व आठ रुपये किलो दराने घ्यावे लागले. एवढ्या धान्यावर त्यांनी उदरनिर्वाह चालवला आहे. 
आता दुकान कधी तरी सुरू करता येईल म्हणून ते ओट्यावर येऊन बसतात. पण लॉकडाउनमुळे ग्राहक येत नाही. एखाद्या दिवशी दुचाकीची सर्व्हिसिंग करून 50 रुपयांची कमाई होते. पण आता घरखर्च चालवणे त्यांना आता अवघड झाले आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They return frustrated because they have no work