तीन अपयश पचवून जिद्दीने बनला अक्कलकोटचा योगेश कापसे आयएएस 

Kapse
Kapse

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील कृषिनिष्ठ शेतकरी शिवकुमार कापसे यांचा चिरंजीव योगेश कापसे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षेत 249 रॅंकने यश मिळवून अक्कलकोट तालुक्‍यात अभिनंदनास पात्र ठरला आहे. आज (मंगळवारी) निकाल जाहीर झाला आणि त्यात त्याने 249 वे रॅंक प्राप्त केल्याचे समजले. त्यानंतर त्याचे आई, वडील व संपूर्ण कापसे कुटुंबीय व मित्रपरिवार यांना आनंद झाला. आज दिवसभर अभिनंदनाचा वर्षाव सुरूच होता. त्याने अक्कलकोट शहरातून शैक्षणिक संघर्ष व प्रयत्न करीत यश संपादन केले. याबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत आहे. 

अक्कलकोट शहरातील तत्कालीन प्रसिद्ध आडत व्यापारी कै. कल्याणप्पा कापसे यांचा नातू तसेच कृषिनिष्ठ शेतकरी श्री. शिवकुमार कापसे यांचा चिरंजीव योगेश हा शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी म्हणून गणला गेला आहे. प्राथमिक शिक्षण लायन्स क्‍लब अक्कलकोट शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण दहावीत 91.30 टक्के गुण मिळवून शहाजी हायस्कूल, अक्कलकोट येथे पूर्ण केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथून बारावी तर पुण्याच्या व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालात ई अँड टीसीची पदवी मिळविली. त्यानंतर एका खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. स्वतःच्या मनाशी उच्च ध्येय बाळगलेल्या योगेशचे मन नोकरीत रमले नाही. त्यामुळे त्याने त्याचा राजीनामा दिला व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी चार वर्षांपूर्वी दिल्ली गाठली होती. दिवसरात्र प्रयत्न करीत राहिला आणि शेवटी चौथ्या प्रयत्नात आपले ध्येय साध्य केले. 

या यशाबद्दल "सकाळ'शी बोलताना योगेश म्हणाला, आपले शालेय शिक्षण कुठे झाले आहे किंवा आपण कोणत्या भागातून आलो आहे याकडे अजिबात लक्ष न देता आपल्याला नेमके काय व्हायचे आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तरच आपल्याला यशाचे शिखर निश्‍चित गाठता येणार आहे. तो पुढे म्हणाला, माझे शालेय शिक्षण अक्कलकोट येथील लायन्स क्‍लब, शहाजी हायस्कूल येथे झाले आहे त्यामुळे आपण अक्कलकोटसारख्या भागातून आलो आहोत, त्यामुळे भारतभरातील मोठ्या शैक्षणिक सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपला निभाव लागेल का, याचा यत्किंचितही विचार मनात आणू नका. मी आणि माझे ध्येयप्राप्ती यासाठी निरंतर संघर्ष आणि प्रयत्न हे अत्यंत आवश्‍यक आहेत. यासाठी एक मूलमंत्र म्हणजे स्वतः प्रामाणिक राहणे आणि प्रचंड आत्मविश्वास असणे आणि मोठे ध्येय ठेवणे तसेच त्यासाठी सतत सकारात्मक ऊर्जेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

योगेश कापसे हा लातूरच्या शाहू महाविद्यालयात बारावी झाल्यानंतर पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी दोन वर्षे केली पण सिव्हिल सर्व्हिस करून आपल्या समाजासाठी काही तरी वेगळे करावे हे ध्येय त्याला सतत सतावत असल्याने त्याने ती नोकरी सोडून त्यासाठी दिल्ली गाठली. यासाठी त्याने तयारी सुरू केली आणि हे यश प्राप्त होण्यासाठी चार वर्षे लागली आणि चार वेळा प्रयत्न करावे लागले. पदरी आलेले तीन अपयश हे यासाठीच्या तीन पायऱ्या समजून पुन्हा जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. यासाठी वडील शिवकुमार, आई जगदेवी तसेच सर्व कापसे कुटुंबीय व मित्रपरिवार यांची प्रेरणा कामी आली आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे यश मिळविणे सोपे गेले. योगेश म्हणाला, यामागील रॅंक पाहता आयएएस किंवा आयपीएस निश्‍चित भेटेल आणि येत्या काळात प्रशिक्षण झाल्यानंतर पदावर जाऊन समाजासाठी काही तरी चांगले करून दाखवावे, ही माझ्या मनातली इच्छा मी पूर्णत्वास नेणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com