कांदाचोरीचा डाव फसला 

आनंद गायकवाड 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

दागिने, रोख रक्कम चोरण्याऐवजी चोरांनी घराबाहेरील चाळीत साठविलेला कांदा चोरण्यास सुरवात केली आहे. हे काम कमी जोखमीचे असल्याने, चोरांनी कांदाचोरीकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. हिवरगाव पावसा येथे नुकताच कांदाचोरीचा असा प्रयत्न फसला. 

संगमनेर ः परतीच्या पावसाने शेतमालाची दैना केल्यानंतर, संकटातून सुदैवाने वाचलेल्या कांद्याला कधी नव्हे ते सोन्याचे दिवस आले. मात्र, आता त्यावरही चोरांची नजर गेली आहे. दागिने, रोख रक्कम चोरण्याऐवजी चोरांनी घराबाहेरील चाळीत साठविलेला कांदा चोरण्यास सुरवात केली आहे. हे काम कमी जोखमीचे असल्याने, चोरांनी कांदाचोरीकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. हिवरगाव पावसा येथे नुकताच कांदाचोरीचा असा प्रयत्न फसला. 

हेही वाचा नामी शक्कल! वाळूची आलिशान वाहतूक! 
 

दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेला कांदा 17 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे. त्यामुळे चाळींमध्ये कांदा साठविलेल्या शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. मात्र, भुरट्या चोरांची वक्रदृष्टी या कांद्याकडे वळली आहे. कांदाचाळीला फारसे संरक्षण नसल्याने, कांदाचोरीचे काम तुलनेत कमी जोखमीचे, त्रासाचे आहे. 

बांधावर गोण्या ठेवून काढला पळ 
तालुक्‍याच्या पठार भागातील हिवरगाव पावसा येथील संतोष दराडे यांच्या वस्तीवर कांदाचाळीतून चोरांनी काल (मंगळवारी) पहाटे तब्बल 30 गोण्या कांदा पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दराडे यांना त्याची चाहूल लागल्याचे पाहून चोरांनी बांधावरच गोण्या टाकून पळ काढला. 

आवश्‍य वाचा चला अंधाराच्या गावा 

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण 

परतीच्या पावसाने दराडे यांनी घेतलेल्या लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. अस्मानी संकटातून वाचलेल्या कांद्याची काढणी करून, तो विक्रीसाठी गोण्यांत भरून दराडे यांनी चाळीत ठेवला होता. मंगळवारी पहाटे चोरांनी चाळीतील सुमारे 30 कांदागोण्या काढून शेताच्या बांधावर ठेवल्या. दरम्यान, चोरांच्या आवाजाने दराडे यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करताच गोण्या सोडून चोरांनी पलायन केले. चोरांचा प्रयत्न फसला असला, तरी या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा वाचविण्यासाठी आता जागता पहारा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to steal onion failed