आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

महामंडळावरील नियुक्ती तत्कालीन राज्यपालांच्या आदेशाने झाल्या आहेत. त्यामुळे विद्यमान राज्यपालांच्या सहीनेचे त्यांचे आस्तित्व संपुष्टात येते. कॅबिनेट, राज्यमंत्री नंतर विविध महामंडळे या राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे हक्काचे ठिकाणे आहेत. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना देवस्थान समितीचे अध्यक्षपद जाणीवपुर्वक रिक्त ठेवले होते.

कोल्हापूर - महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांच्या वाट्याची महामंडळाची कायम राहतील, मात्र भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात पदे दिली, ती आता संपुष्टात येतील. समरजतिंसिंह घाटगे यांनी "म्हाडा'चा पूर्वीच राजीनामा दिला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भाजपच्या हातातून जाणार आहे.

वाचा - कोल्हापुरातील भाजपच्या या सत्ताकेंद्रांना बसणार हादरे

महामंडळावरील नियुक्ती तत्कालीन राज्यपालांच्या आदेशाने झाल्या आहेत. त्यामुळे विद्यमान राज्यपालांच्या सहीनेचे त्यांचे आस्तित्व संपुष्टात येते. कॅबिनेट, राज्यमंत्री नंतर विविध महामंडळे या राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे हक्काचे ठिकाणे आहेत. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना देवस्थान समितीचे अध्यक्षपद जाणीवपुर्वक रिक्त ठेवले होते. भाजप - शिवसेनेच्या काळात सत्तेचे निम्मे सत्र सरकल्यानंतरच महामंडळाचे वाटप झाले. भाजपने मात्र कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

भाजपने यांना दिली होती पदे

समरजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना म्हाडा ( पुणे ) चे अध्यक्षपद दिले. महेश जाधव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले. शिवसेनेच्या कोट्यातून संजय पवार यांची अण्णासाहोब पाटील पाटील आर्थिक विकास महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली. हे पदही राज्यमंत्री दर्जाचे आहे. तर भाजपच्या कोट्यातून राहूल चिकोडे यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्यपद तर विजय जाधव यांना पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य,अशोक देसाई यांनी "सांस्कृतिक'चे सदस्यपद दिले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपविली गेली. या पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या नियुक्ता अशाच खोळंबून ठेवल्या गेल्या भाजपसह शिवसेनेचे कार्यकर्ते सत्ता आल्यापासून कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या प्रतीक्षेत होते.

हेही वाचा - विनय कोरेंनी महाआघाडीत येण्यासाठी 'यांच्यामार्फत' सुरु केले प्रयत्न 

यांची पदे जाण्याची शक्यता 

कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत आल्याने सेनेच्या वाट्याला आलेल्या राज्य नियोजन मंडळ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नियुक्ती कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या वाट्याला महामंडळे आली त्यातून कोल्हापुरातून ज्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाली त्यांची पदे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - मंत्रिमंडळात कोल्हापुरातील या आमदारांचा समावेश होण्याची शक्यता 

यांचाही विचार करावा लागणार

महामंडळांची संख्या मर्यादित आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सरकार कुणाचे आले तरी सुरवातीच्या टप्यात महामंडळावर कुणाचीही नियुक्ती केली जात नाही. महाविकासआघाडी सोबत शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्र पक्ष असल्याने त्यांचा विचार करावा लागणार आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेपासून काही काळ दूर गेल्याने त्यांचा महामंडळे समान वाटपाचा आग्रह असणार आहे. कोल्हापुरच्या वाट्याला जी महामंडळे येतील त्यात वाटपात खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची भुमिका महत्वाची असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention Towards Appointments On Corporation