
अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी आज राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातही मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता आहे.
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.
अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी आज राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातही मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील भाजपच्या या सत्ताकेंद्रांना बसणार हादरे
मुश्रीफ प्रत्येक घडामोडीत पवारांसोबत
शनिवारी (ता. 23) सकाळी अचानक अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना गुंगारा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या "सिल्वर ओक' निवासस्थानी पहिल्यांदा श्री. मुश्रीफच पोचले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अजित पवार यांच्यासोबत कोण, असा ज्या वेळी प्रश्न निर्माण झाला त्यावेळी श्री. मुश्रीफ यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे कृतीतून दाखवून दिले. प्रत्येक घडामोडीत ते श्री. पवार यांच्या मागेच होते.
हेही वाचा - राज्यातील घडामोडीनंतर सांगलीत मिनी मंत्रालयाची दिशा बदलणार ?
विधानसभेच्या निवडणुकीतही श्री. मुश्रीफ यांच्या पराभवासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जंग जंग पछाडले. तत्पूर्वी त्यांना भाजपमध्ये येण्याची "ऑफर' दिली; पण ती श्री. मुश्रीफ यांनी धुडकावून लावली. अल्पसंख्याक चेहरा, अनुभव आणि पवारनिष्ठ म्हणून त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्चित समजली जाते.
कॉंग्रेसकडून विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याबरोबरच कॉंग्रेस एकनिष्ठ या जोरावर आमदार पी. एन. पाटील यांनीही मंत्रिपदासाठी "लॉबिंग' सुरू केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा कॉंग्रेसमुक्त झाला; पण यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल चार आमदार निवडून आले. श्री. पाटील यांच्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सतेज पाटील हेही घडामोडीत आघाडीवर होते. एवढेच नव्हे तर निकालानंतर कॉंग्रेसच्या आमदारांना जयपूरमध्ये ठेवले होते, त्याठिकाणीही ते उपस्थित होते. शनिवारी सकाळी ते कोल्हापुरात आले; पण नाट्यमय घडामोडी घडल्याचे समजताच त्यांनी पुन्हा बेळगावमार्गे विमानाने मुंबई गाठली. गेल्या तीन दिवसांतील कॉंग्रेसच्या घडामोडीतही ते आघाडीवर होते, त्यातून त्यांनाही मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे.
2014 च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र सेनेचा बालेकिल्ला होता; पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात सेनेचे तीनच आमदार निवडून आले. त्यात राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल सहा आमदार असलेल्या या जिल्ह्यात श्री. आबिटकर एकमेव आहेत. या जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी तरुण व लढाऊ आमदार म्हणून त्यांचीही मंत्रिपदी वर्णी लागू शकते. त्यांना डावलून मंत्रिपद द्यायचे झाल्यास साताऱ्यातून शंभूराजे देसाई किंवा सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर यांचा विचार होऊ शकतो.