धरणात पाणी असल्यामुळे उन्हाळा सुसह्य जाण्याची चिन्हे

मिलिंद गिरमे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

0 गतवर्षी उन्हाळ्यात एकच पाणी मिळाल्यामुळे पिके गेली होती वाळून

0 लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळा अतिशय उत्तम जाणार

0 सध्या तिन्ही धरणांतून विसर्ग बंद

0 उन्हाळ्यात एक जादा पाण्याची पाळी मिळू शकणार 

लवंग (जि. सोलापूर) : यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर, गुंजवणी या धरणात अद्यापही शंभर टक्के पाणीसाठा आहे. या धरणावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळा अतिशय उत्तम जाणार असून वीर धरणामध्ये आज 22 नोव्हेंबरअखेर गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी जादा पाणी शिल्लक असल्याने उन्हाळ्यात एक जादा पाण्याची पाळी मिळू शकणार आहे. 

हे ही वाचा... पिंपरी शहरास सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

यावर्षी उशिरापर्यंत पाऊस न झाल्याने उन्हाळा अतिशय कडक जाऊन दुष्काळ पडला होता. या दुष्काळात पिके वाळून गेली होती. जनावरांना चारा नव्हता. जो ऊस उपलब्ध होता तो जनावरांच्या छावणीसाठी गेला. नंतर उशिरा पावसाने सुरवात केली आणि खंड न पडता सतत बरसत राहिल्याने यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या चारही धरणांच्या कॅचमेंटमध्ये आणि लाभक्षेत्रात पाऊस होता. सध्या तिन्ही धरणांतून विसर्ग बंद आहे आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून किमान 15 दिवस तरी पाण्याची मागणी होणार नसल्यामुळे धरणातील हा साठा तसाच शंभर टक्के राहणार असून त्याचा फायदा उन्हाळ्यात नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्याला होणार आहे. 

 

हे ही वाचा... पुणेकरांना मिळणार पुरेसे पाणी, पण पाणीपट्टीचे काय?

गतवर्षी उन्हाळ्यात एकच पाणी मिळाल्यामुळे पिके वाळून गेली होती. विहीर, बोअर आटले होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु यंदा पावसाने कृपा केल्यामुळे येणारा उन्हाळा शेतकऱ्यांना अतिशय चांगला जाईल, असे पाटबंधारे खात्याचे अधिकारी सांगतात.

 

हे ही वाचा... अजित पवारांचा एक फोन आला अन...

आकडे बोलतात ः यंदा भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी धरणात 22 नोव्हेंबरअखेर 100 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी 22 नोव्हेंबर 2018 अखेर अनुक्रमे भाटघर 89.77 टक्के, नीरा-देवघर 84.06 टक्के, वीर धरण 46.70 टक्के आणि गुंजवणी धरणात 73.44 टक्के इतका पाणीसाठा होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of the water in the dam The signs of a smooth summer