esakal | बेळगाव महापालिकेसाठी उद्या मतदान; 385 उमेदवार रिंगणात
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव महापालिकेसाठी उद्या मतदान; 385 उमेदवार रिंगणात

बेळगाव महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ३३ नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे.

बेळगाव महापालिकेसाठी उद्या मतदान; 385 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : संपूर्ण कर्नाटक राज्याचे व महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी शुक्रवारी (३) मतदान होणार आहे. बेळगाव शहरातील ४१५ मतदानकेंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत हे मतदान होईल. महापालिका निवडणूकीच्या रिंगणात तब्बल ३८५ उमेदवार आहेत. शहरातील ४ लाख ३० हजार ८२५ मतदार या निवडणूकीत ५८ नगरसेवक निवडून महापालिकेवर पाठवणार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या २ लाख १४ हजार ८४८ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या २ लाख १५ हजार ९७७ इतकी आहे.

शहरात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांकडून लढविली जात आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आम आदमी पार्टी व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीतील रंगत व चुरस वाढली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी २३ अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत, उर्वरीत प्रभाग खुले सोडले आहेत. दरवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीसमोर कन्नड व उर्दू भाषिक उमेदवारांचे आव्हान असायचे व यावेळी समिती उमेदवरांना एकाचवेळी पाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत दोन हात करावे लागणार आहेत.

हेही वाचा: बेळगावात गोवा बनावटीची दारु पकडली; पुण्यातील 2 जण अटकेत

बेळगाव महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ३३ नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व भाजपने ४० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला आहे. अपवाद वगळता आजवर बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजेच मराठी भाषिकांची सत्ता राहिली आहे. यावेळी बेळगावचे मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे पहावे लागणार आहे. ६ सप्टेबर रोजी मतमोजणी होणार आहे.

महापालिका निवडणूकीची तयारी विभागाने पूर्ण केली आहे. या निवडणूकीसाठी सुमारे २२०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गुरूवारी सायंकाळी ईव्हीएम सह ते कर्मचारी मतदानकेंद्रांकडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. महापालिका निवडणूकीसाठीच्या जाहीर प्रचाराची सांगता ४८ तास आधी म्हणजे बुधवारी सकाळी 7 वाजताच झाली आहे.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार

बुधवारी व गुरूवारी दिवसभर उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेवून मतदानाचे आवाहन केले आहे. याआधी मार्च २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे पाच वर्षे महापालिकेत समितीची सत्ता होती. मार्च २०१९ मध्ये सभागृहाचा कार्यकाळ संपला, तेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे या निवडणूकीनंतर म्हणजे तब्बल अडीच वर्षानंतर पालिकेत लोकनियुक्त सभागृह येणार आहे. गेल्या आठ दिवसाच्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्दे चर्चेला आले आहेत. त्यामुळेच ही निवडणूक लक्ष्यवेधी ठरली आहे.

  • प्रभाग संख्या-५८

  • मतदारसंख्या-४,३०,८२५

  • पुरूष मतदार-२,१४,८४८

  • महिला मतदार-२,१५,९७७

  • उमेदवारांची संख्या-३८५

  • मतदानकेंद्रांची संख्या-४१५

हेही वाचा: राज्यपाल नियुक्त आमदारकी यादीतून वगळले? शेट्टींचा मोठा 'खुलासा'

loading image
go to top