बापरे : काेल्हापुरात उलट्या बाहुलीने उंचावल्या भुवया

Black Magic Doll In Shahu Proclamation Inauguration Program Kolhapur Marathi News
Black Magic Doll In Shahu Proclamation Inauguration Program Kolhapur Marathi News

काेल्हापूर : राजर्षी शाहू महाराज समाधी लोकार्पण सोहळा अमाप करवीरवासीयांच्या साक्षीने पार पडला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली. राजर्षी शाहू महाराज यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि अंधश्रध्देच्या विरोधात आयुष्य वेचले. अशा लोकराजाच्या समाधी लोकार्पण सोहळ्याच्या भव्य व्याससमोपीठार मात्र उलटी काळी बाहुली बांधून आयोजकांनी शाहू महाराजांच्या मूळ विचारांनाच छेद देण्याचे काम केले. ही बाहुली मात्र कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय झाली होती. 


शरद पवार यांनी शाहू राजांच्या अंधश्रध्देच्या विरोधात त्यांचे मत कसे होते, याचा उदाहरणासह दाखला दिला आणि आयोजकांपैकी कोणालातरी या बाहुलीच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यामुळे नंतर ही बाहुली काढून टाकली गेली.  
महापालिकेच्यावतीने सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे समाधी स्मारक उभारण्याचे काम गेली तीन वर्षे चालू आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज पार पडले. 

भव्यदिव्य सोहळा  मात्र उलटी काळी बाहुली
दसरा चौकात या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला. हजारो करवीरवासीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुमारे दोनशे फुटांच्या व्यासपीठावर मान्यवरांची बैठक व्यवस्था केली होती. संपूर्ण मंडप पांढऱ्या स्वच्छ कापडांमुळे आकर्षक दिसत होता. उपस्थितांना सोहळा नीट दिसावा, यासाठी मोठे एलईडी स्क्रीन लावले होते. एकंदरीत भव्यदिव्य सोहळा होता. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्क्रीनवर पाहताना मात्र उपस्थितांना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येत होती. व्यासपीठावरील मान्यवरांना सोहळा दिसावा, यासाठी स्टेजच्या मध्यभागी मोठा टीव्ही लावण्यात आला होता.  

हास्यापाठोपाठ कुजबुजही सुरू

स्टेजच्या मध्यावरच मात्र मोठी काळी बाहुली टांगलेली दिसत होती. उपस्थितांना स्टेजवरील लाईव्ह कार्यक्रम पाहताना कॅमेऱ्यासमोर काळी बाहुली दिसून येत होती. याची कुजबुज सभागृहात सुरू झाली. शाहू महाराजांच्या कार्याविषयी बोलताना तर थेट गोष्ट सांगूनच शाहू महाराज हे अंधश्रध्देच्या विरोधात कसे होते, याचा दाखलाच दिला. यामुळे मोठा हशा पिकला.

आयोजकांच्या अंधश्रध्देवरही पडदा पडला

खरेतर या हास्यात स्टेजच्या अग्रभागी दिसणारी काळी उलटी बाहुली हाही विषय असल्याने काहीकाळ हास्यापाठोपाठ कुजबुजही सुरू झाली. आणि मग स्टेजवरील काही मान्यवरांनी ही बाब कारभारी नगरसेवकांच्या लक्षात आणून दिली. ही बाहुली सर्वांसमोर काढणे शक्‍य नसल्याने स्टेजखालून माणूस हळुवार पणे गेला. स्टेजसमोरच्या पडद्यामागून आलेल्या हाताने ही बाहुली आत ओढून घेतली आणि  आयोजकांच्या अंधश्रध्देवरही पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com