कावळ्यांना फरसाण अन्‌ चिवड्याचा नाश्‍ता

अक्षय गुंड
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- माढा येथील हॉटेलवाला बनला आधारवड 
- दररोज येथे 50 ते 60 कावळे 
- रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनाही कुतूहल

उपळाई बुद्रूक (ता. माढा) : भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी, पशुपक्षी, मुक्‍या प्राण्यांना अभय द्या. सेवा परमो धर्म, हाच आपला रोकडा धर्म, हीच खरी भक्ती नि देवपूजा आहे, असा जीवनाचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या विचारांना आत्मसात करून माढा शहरातील एक हॉटेलवाला कावळ्यांचा आधारवड बनला आहे. अर्जुन शिवाजी भांगे असे त्या अवलियाचे नाव. कसलीही भीती न बाळगता भांगे यांच्या हॉटेलसमोर दररोज फरसाण व चिवडा खाण्यास 50 ते 60 कावळे जमा होतात.

चंदगड तालुक्यातील हत्तीचा प्रश्न सुटणार कधी ?

भारतीय संस्कृतीत कावळ्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पितरांचे श्राद्ध घालताना काकस्पर्शासाठी पिंडदान करण्याची प्रथा आहे. कावळ्याने पिंडाला स्पर्श केला तर पितरांच्या आत्म्याला शांती लाभते, असा समज आहे. त्यामुळे पिंडदान करताना अनेकदा कावळ्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नसतो. अलिकडे बदलत्या काळात पशुपक्ष्यांची संख्या कमी होत आहे. कावळेही नाहीसे झाले आहेत. क्वचितच एकादा कधीतरी कावळा पाहण्यात येतो. परंतु, माढा शहरातील अर्जुन भांगे यांच्या हॉटेल क्रांतीसमोर रोज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 50 ते 60 कावळे फरसाण व चिवडा खाण्यासाठी दिसतात. गेली पाच ते सहा महिन्यांपासून भांगे यांच्या हॉटेलपुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे कावळे दाखल होतात. 

सोलापुरात महापालिकेत चौथ्यांदा महिलाराज 

भांगे हेही त्यांना दरोरज फरसाण व चिवडा हे खाद्य टाकतात. त्यामुळे न चुकता हे कावळे दरोरज सकाळी हॉटेल पुढे येत असल्याचे पाहून रस्त्यावरून येणारे जाणारे कुतूहलाने पाहतात. एकिकडे कावळा पहायला मिळत नसताना माढा शहरातील हॉटेलसमोरील कावळ्यांची गर्दी पाहून सर्वजण आश्‍चर्यचकित होतात. 

पतीने का केला पत्नीवर चाकू हल्ला?

जसा माणूस हा अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठी धडपडत असतो. तसे निसर्गात अजूनही जीव आहेतच. ज्यांच्या देखील गरजा असतातच. माणसाला आपल्या गरजा भागवता येत असल्या तरी बिचाऱ्या प्राणी-पक्ष्यांना मात्र त्या भागवता येत नाहीत. त्यामुळे ते बिचारे भटकत असतात. आपल्यासारख्या लोकांनीच त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे. अन्‌ ते मी करत आहे. 
- अर्जुन भांगे, हॉटेल चालक 

कावळा हा अपशकुनी म्हणून मानला जातो. परंतु अर्जुन भांगे हे सकाळी हॉटेल उघडताच प्रथम कावळ्यांना फरसाण, दाणे टाकून उद्योगाला सुरवात करतात. कावळ्यांची व त्यांची जणू दोस्ती असल्याचे दरोरज सकाळी आम्ही नाश्‍ता करायला आल्यास पहायला मिळते. 
- शिवाजी यमलवाड, ग्राहक

महाराष्ट्र  सोलापूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast for the crowds