दफनविधीसाठी मिळाली नाही जागा, मग घराजवळच उरकला दफनविधी...

Burial ceremony near home after argument place in sangli
Burial ceremony near home after argument place in sangli

वांगी- वांगी (ता. कडेगाव) येथील लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या जागेच्या वादात रुक्‍मिणी रामचंद्र औंधे (वय 78) यांचा मृतदेह सुमारे पंचवीस तास ताटकळत राहिला. पोलिस आणि महसूल विभागाच्या तडजोडीच्या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर नातलगांनी घराजवळील जागेतच दफनविधी उरकला. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यात निर्णय घेण्यात प्रशासनाला अपयश आले आणि लोकप्रतिनिधींचे या प्रश्‍नांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे आज औंधे कुटुंबीयांवर अशी वेळ आली. या विषयावरून आज दुपारी 1 वाजेपर्यंत गावात मोठा तणाव होता. 

याबाबतची अधिक माहिती अशीः वांगी गावाच्या दक्षिणेस असणाऱ्या शेतजमीन गट क्रमांक 1599 आणि 2469 या जमिनीचा लिंगायत समाज दफनविधी करीत असे. परंतु या जागेची नोंद दप्तरी नाही. सुमारे दहा वर्षांपूर्वी ही जागा आठ खासगी व्यक्तींची असल्याचे व तसा त्यांचे नावे 7/12 उतारा निघतो. तेव्हापासून या समाजाचा दफनभूमीचा विषय वादाचे निमित्त ठरत आहे. आजच्या सारखाच प्रकार सात महिन्यांपूर्वी झाला होता. गावातील तरुण मोहन हडदरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह प्रांताधिकारी कार्यालयात नेण्यात आला होता. तत्कालीन प्रांताधिकारी व तहसीलदारांनी त्यावेळी संबंधित जागा मालकांशी चर्चा करून दफन करण्याची संमती मिळवून वाद शमवला. त्यावेळी त्यांनी आठ दिवसांत याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यानंतर पुन्हा सामसूम झाली. आज गावातील ज्येष्ठ महिलेचे निधन झाल्यानंतर पुन्हा हा वाद उद्‌भवला. 

रविवारी (ता.26) दुपारी बारा वाजता औंधे यांचे निधन झाले. त्यानंतर काल निधनाचे वृत्त समजल्यानंतर सरपंच डॉ. विजय होनमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचणीचे पोलिस निरीक्षक संतोष गोसावी, तहसीलदार शैलजा पाटील, प्रांताधिकारी गणेश मरकड सर्वजण रात्री 12 पर्यंत दोन्ही गटांशी चर्चा करीत होते. मात्र मार्ग निघाला नाही. दरम्यान रात्री पावणेअकरा वाजता लिंगायत समाजातील ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्याकडेला आणून ठेवला. आज सकाळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी सलग चार तास सर्वांशी विचारविनिमय करून तोडगा काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अंतिम तोडगा निघत नव्हता. अखेर खासगी मालकांनी आपल्या मालकीतीलच दक्षिणेकडे सरकून चार गुंठे जागा दफनभूमीसाठी देण्याचे कबूल केले. मात्र लिंगायत समाजाला हाही तोडगा मान्य झाला नाही. अखेर डुबुले यांनी मृतदेहाची हेळसांड थांबवून पटकन दफनविधी करा अन्यथा प्रशासन दफनविधी उरकेल. असे सांगितल्यावर कुटुंबीयांनी घराजवळच दफनविधी उरकण्याचे ठरविले. त्यानुसार तब्बल 25 तासांनी दुपारी 2 वाजता हा अंत्यविधी पार पडला. मात्र यावरून काल दुपारपासून गावात तणाव होता. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com