#Solapur : दिवसभरात काय घडलं गुन्हेविश्वात? वाचा..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

कपाट उघडून लाकडी लॉकरमध्ये पाहिल्यानंतर आतमध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले. सकाळी कपाट उघडल्यानंतर कपाटामध्ये सोने होते. सकाळी ते सायंकाळी सहाच्या या कालावधीत चोरटयाने घरातील सोन्याची चोरी केली आहे.

सोलापूर : शहर परिसरात मंगळवारी दिवसभरात घडलेल्या गुन्हे विषयक बातम्या वाचा..

उद्योजकाच्या घरातून साडेपाच लाखाची चोरी 
उद्योजक जयसिंह शंकरराव लिंगे यांचे घर फोडून सुमारे साडेपाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना पुणे रोडवरील गणेशनगर मधील बालाजी अपार्टमेंटमध्ये 12 जानेवारी रोजी सायंकाळी सहापूर्वी घडली आहे. लिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगे यांचा एमआयडीसी भागामध्ये प्लास्टिक पाईपचा कारखाना आहे. 12 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी पत्नीस आईचे दागिने हे सक्रांतीच्या सणाकरिता कपाटातून बाहेर काढण्यास सांगितले. पत्नीे वनिता यांनी कपाट उघडून लाकडी लॉकरमध्ये पाहिल्यानंतर आतमध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले. सकाळी कपाट उघडल्यानंतर कपाटामध्ये सोने होते. सकाळी ते सायंकाळी सहाच्या या कालावधीत चोरटयाने घरातील सोन्याची चोरी केली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे नेकलेस, कानातील रिंग, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स आणि पाच हजारांची रोकड असा एकूण 5 लाख 45 हजार 656 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्याने चोरी केल्यानंतर कपाटाची चावी जिथे होती तिथेच ठेवली होती.

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

वाळू चोरी, सरकारी कामात अडथळा; 
ट्रक मालकांसह चौघांना दंडाची शिक्षा 

वाळू चोरी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात न्यायालयाने ट्रक मालकांसह चौघांना प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास सहा महिने कैद शिक्षा सुनावली आहे. उमाशंकर नरसप्पा माने (वय 35, रा. इंदिरानगर, मंद्रूप), महादेव अशोक पाटोळे (वय 35), मलिक गनी नदाफ (वय 28), उस्मान गनी नदाफ (वय 32) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. 30 ऑगस्ट 2015 रोजी मंद्रूप परिसरात तहसीलदारांच्या पथकाने वाळू चोरी प्रकरणात दोन ट्रकवर कारवाई केली होती. या वेळी आरोपींनी मंडलाधिकारी धैर्यशील जाधव आणि तहसीलदार रघुनाथ पोटे यांच्यासोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला आणि दमदाटी केली होती. पोलिस हवालदार तानाजी लकडे यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे ऍड. अहमद काझी, आरोपीतर्फे ऍड. नागेश खिचडे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा - वादग्रस्त लेखकाच्या पुतळ्याला फासले काळे

अक्षता सोहळ्यावेळी तिघा भाविकांचे मोबाईल गायब 
सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात अक्षता सोहळ्यासाठी आलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल गायब झाले. एका भाविकाचे आधार कार्ड गहाळ झाल्याची नोंद फौजदार चावडी पोलिसांत झाली आहे. श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात अक्षता सोहळ्यासाठी शहर-जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांची उपस्थिती होती. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच चोरीचे प्रकार होऊ नये याची देखील खबरदारी घेतली होती. विशेष शाखेचे पोलिस कर्मचारी देखील साध्या वेशात तैनात केले होते. तिघा भाविकांचे मोबाईल गायब झाले. दोन दुचाकी वाहने चोरीस गेल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

व्यवसायासाठी चोरून वापरली वीज 
वीज चोरी केल्याप्रकरणी मैनोद्दीन महमद रफीक हत्तुरे याच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरत्या पथकाचे राजेश घोडे यांनी फिर्याद दिली आहे. फिरत्या पथकाने बेगम पेठ येथील हत्तुरे यांच्या उज्ज्वला ऍक्वा या प्रकल्पावर छापा टाकला. तिथे हत्तुरे याने 2 जानेवारी 2018 ते 2 जानेवारी 2020 या दोन वर्षांच्या कालावधीत महावितरण कंपनीच्या 39 हजार 637 युनिटची चोरी केल्याचे दिसून आले. यात पाच लाख पाच हजार 735 रुपयांची वीज चोरी करून वापरल्याप्रकरणी हत्तुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंके तपास करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news at solapur