अन्‌ मगरीने मारली पाण्यात उडी! 

परशुराम कोकणे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- कोयना नगर परिसरात ओढ्यात दिसली मगर 
- शेतकरी, मजुरांमध्ये भीतीचे वातावरण 
- युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी 
- महापालिकेने शोध मोहीम राबविण्याची मागणी 

सोलापूर : देगाव परिसरातील कोयनानगर येथील ओढ्यामध्ये साडेचार फुटांची मगर दिसल्याची माहिती शेतमजुरांनी दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातून मगरीचे दोन पिल्ले गायब झाले होते. त्यापैकीच ही मगर असण्याची शक्‍यता परिसरातील नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा : अजब ! कुत्र्यांपासून बचावासाठी बिबट्या झाडावर  (व्हिडिओ)

मला ओढ्याच्या शेजारी मगर दिसली 
दिनेश घोडके या शेतमजुराला शुक्रवारी सकाळी कोयना नगर येथील ओढ्यामध्ये साधारण साडेचार ते पाच फूटाची मगर दिसली. श्री. घोडके यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी सहकाऱ्यांसोबत शनिवारी सकाळी कोयना नगर परिसरातील ओढ्याची पाहणी केली. त्यांना कोठेही मगर दिसून आली नाही. मगरीची माहिती सांगताना श्री. घोडके म्हणाले, "शुक्रवारी सकाळी मी कामानिमित्त कोयना नगर परिसरातील ओढ्यापासून जात होता. ओढ्याकडे माझे लक्ष गेले. मला ओढ्याच्या शेजारी एक मगर दिसली. मी घाबरून मागे सरकलो. तेव्हा मगरीने पाण्यात उडी मारली.'

हेही वाचा : "गेम'मधील गोळीबाराचे हावभाव! ​काय झालंय या तरुणाला?

गायब झाली होती मगरीचे पिल्ले 
विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरात महापालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयातून काही महिन्यापूर्वी मगरीचे दोन पिल्ले गायब झाली होती. त्याच मगरीपैकी एक मगर कोयना नगर परिसरात असण्याची शक्‍यता असल्याचे युवा सेनेचे शहरप्रमुख वानकर यांचे म्हणणे आहे. या संदर्भात महापालिकेने शोध मोहीम राबवावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोणताही पुरावा नाही 
या संदर्भात महात्मा प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी कोयना नगर येथे मगर दिसल्याचे पत्रकारांकडून कळाले आहे. याबाबत कोणताही पुरावा नाही असे सांगितले. दरम्यान, कोयना नगर परिसरात मगर दिसल्याचे माहिती सोशल मीडीयावरून व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile has been spotted in Solapur