ताम्रपर्णी नदीच्या पात्रात 'या' ठिकाणी मगरीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

शुक्रवारी दुपारी दोन वाजता मळवी कोंड नावाच्या शेता जवळ नदीच्या पाण्याबाहेर गवतात पडलेल्या मगरीचे लोकाना दर्शन झाले. वनविभागाने तात्काळ नदीकाठावरील चिंचणे व कुदनूर गावच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याची गरज आहे. 

चंदगड ( कोल्हापूर ) - चिंचणे येथील ताम्रपर्णी नदीच्या पात्राबाहेर नागरीकाना मगरीचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण झाले आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता मळवी कोंड नावाच्या शेताजवळ नदीच्या पाण्याबाहेर गवतात पडलेल्या मगरीचे लोकाना दर्शन झाले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने तात्काळ नदीकाठावरील चिंचणे व कुदनूर गावच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. 

गेल्या चार दिवसापासून नदीपात्रात मगरीचा वावर असल्याची लोकांच्यात चर्चा होती. पण प्रत्यक्षात ठोस पुरावा नसल्याने लोकांच्यात संभ्रमावस्था होती. शुक्रवारी दुपारी विष्णू तरवाळ यांना पुन्हा मगरीचे दर्शन झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक दत्तात्रय नाईक यांना कल्पना दिली. ग्रामसेवक नाईक हे तात्काळ नदीकाठावर गेले. त्यावेळी त्याना कुदनूर गावच्या बाजूला पाण्याच्या बाहेर गवतात पडलेली मगर दिसली. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलवर मगरीचा व्हिडीओ केल्याने नदीपात्रात मगर असल्याची सर्वांची खात्री पटली.

हेही पाहा - चला ! पंचगंगा घाट अनुभवूया; जाणून घेऊया दडलेला इतिहास 

शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज

गेल्या चार दिवसापासून मगर एकाच ठिकाणी दुपारच्या वेळी पुन्हा पुन्हा पाण्याबाहेर येत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कुदनूर गावच्या दिशेने नदीकाठावर मगरीचा वावर असल्याने गवत कापण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कामेवाडी,दुंडगे,चिंचणे,कालकुंद्री,कोवाड याठिकाणचे शेतकरी दररोज पाणी पाजण्यासाठी जनावराना नदीत घेऊन जातात. तसेच कोवाड, कालकुंद्री व दुंडगे येथील कांही ग्रामस्थ नदीत अंघोळीसाठी जातात. त्यामुळे वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा,अशी मागणी होत आहे. 

हेही पाहा - इतिहासप्रेमींनो...पन्हाळागड ढासळतोय 

हिडकल डॅममधून मगरी नदीपात्रात

नदीचे पाणी कमी होत असल्याने हिडकल डॅममधून मगरी नदीपात्रात येत असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. दोन वर्षापूर्वी कोवाड व दुंडगे येथे नदीपात्रात मगरींचे दर्शन झाले होते. त्याअनुषंगाने नदीपात्रात एकापेक्षा जास्त मगरी असण्याची शक्‍यता ग्रामस्थांतून वर्तवली जात आहे.

नागरिकांना सर्तकेचा इशारा

नदी पात्रात मगर असल्याची चार दिवस चर्चा होती. आज पुन्हा ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाल्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता. गवतात पडलेली मगर दिसल्याने आमचीही खात्री पटली. त्यामुळे नागरीकाना सर्तकेचा इशारा देऊन वनविभागाला याची कल्पना दिली आहे. 
दत्तात्रय नाईक, ग्रामसेवक, चिंचणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile Seen In Chinchane Village Chandgad Taluka