बापरे! पेट्रोल, डिझेलपेक्षा खायचे तेल महाग 

प्रशांत देशपांडे 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • करडई तेल गेले सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर
  • शेंगातेलाने गाठली शंभरी 
  • सूर्यफूल तेल 104 रुपये किलो 
  • पामतेल शंभरीच्या आत 

सोलापूर : करडई तेलाची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. या तेलाच्या दराने 150 रुपये पार केले असून शेंगातेल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या पेट्रोलचे लिटरचे दर 81 रुपये 13 पैसे आहे तर तेलाची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गृहिणींना घराचे बजेट कसे सांभाळावे, हा प्रश्‍न पडला आहे. 

हेही वाचा : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुुजबळांकडे; पहा कोण कोठे राहणार? 

तेलाचे प्रतिकिलोचे दर 
शेंगातेल : 100, करडई तेल : 170, सूर्यफूल : 104, सोयाबीन तेल : 100, पामतेल : 84, रोहिणी सुप्रिम तेल : 92 

पेट्रोलचे दर (लिटरमध्ये) : साधे पेट्रोल : 81.31 डिझेल : 69.53, सुपर पेट्रोल : 84.16 

हेही वाचा : अजित पवारांचा तो निर्णय कुटुंबात कोणालाही पटला नाही : शरद पवार 

महागाईचा परिणाम 
आम्ही घरी सुप्रिम तेल दर महिन्याला 15 किलो तेल आणतो. अगोदर 15 किलोचा डबा 1100 रुपयाला मिळायचा; मात्र सध्या तेलाच्या किमती वाढल्याने तोच डबा आता 1500 रुपयांना मिळत असल्याने घरातील बजेट कोलडमले आहे. या वाढलेल्या छुप्या महागाईमुळे महिन्याअखेरीस पैसा संपतो. 
- श्रुती पडवळे, गृहिणी 

देवासमोर तेलाचा दिवा 
आम्ही घरी खाण्यासाठी शेंगातेल वापरतो. मात्र शेंगाच्या तेलाचे दर वाढले. त्यातून दरमहा एक तरी सणवार असतो. त्यावेळी काही प्रमाणात तरी तळणे होतेच. त्याला तेल जास्त जाते. त्यामुळे महिन्याला सात ते आठ किलो तेल लागते. त्याचबरोबर घरात देवासमोर चांगल्या तेलातीलच दिवा लावावा लागतो. त्याला किमान दोन किलो तरी तेल लागते. 
- वैभवी कामतकर, गृहिणी 

हेही वाचा : चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती सोहळा 
दर महिन्याला अधिक पैसे
 
सगळ्याच वस्तूंचे दर वाढल्याने घरातील बजेट अगोदरच कोलमडले आहे. त्यात तेलाचे दरही वाढल्याने महिन्याला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्याचा परिणाम महिना अखेरीस पैशाची चणचण भासते. त्यामुळे घरात काही दिवस अडचण भासते. 
- जयलक्ष्मी पडगानूर, गृहिणी 

15 दिवसांपासून दरात वाढ 
आम्ही घरी सूर्यफुलाचे तेल वापरतो. 15 दिवसांपासून तेलाच्या दरात वाढ झाल्याने घरी तेल जपून वापरावे लागत आहे. त्यामुळे लहान मुलांना व सणाच्या दिवशी भजी आणि पाडप तळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे घरचे बजेच कोलडमले आहे. त्यामुळे स्वंयपाकाचा अंदाजही चुकत आहे. 
- मधुरा देशपांडे, गृहिणी 

टॅक्‍सचा परिणाम 
15 दिवसांपासून तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. पामतेल, रोहिणी, सुप्रिम तेलाची आयात कमी झाल्याने त्याचे दर वाढले आहेत. भारत सरकारने मोठ्या प्रमाणावर टॅक्‍स लावल्याने तेलाचे दर वाढले आहेत. 
- अभिजित परदेशी, तेलाचे व्यापारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Edible oil more expensive than petrol