पोथरेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग (Video)

नानासाहेब पठाडे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ट्रॅक्‍टरसाठी मोठे भांडवल व बैलजोडी सांभाळणे कठीण आहे. शेतातील कामे भाड्याने करणे परवडत नाही. त्यामुळे दुचाकीलाच ट्रॉली जोडली. शेतातील 70 टक्के कामे दुचाकीवर होतात. यातून वेळ व खर्च वाचला. 
- शिवाजी झिंजाडे, शेतकरी, पोथरे 

पोथरे (सोलापूर) : विज्ञानाने प्रगती करत अत्याधुनिक नवनवीन साधने निर्माण केली. यातीलच दुचाकी साधन माणसाला प्रवासासाठी निर्माण केले. परंतु, याचा उपयोग पोथरे (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी सखाराम झिंजाडे यांनी प्रवासापुरताच न करता दुचाकीला छोटी ट्रॉली जोडून ते शेतातील कामे करतात. शेतात शेणखत वाहण्यापासून ते मका, ज्वारी व कडबा गोळा करण्यापर्यंत याचा उपयोग केला आहे. त्यांच्या प्रयोगाने पैसा तर वाचलाच शिवाय त्यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी ठरले आहे. 

हेही वाचा : मोदींची ऑफर नाकरली 
दुचाकीसाठी बनवली ट्रॉली 

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. 50 ते 100 एकर जमीन असणारा शेतकरी आता अवघ्या पाच-10 एकरावर येऊन ठेपला आहे. अल्प शेतीत बैलजोड्या सांभाळणे न परवडण्याजोगे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरला पसंती दिली. परंतु, याही पुढे ट्रॅक्‍टरसाठी पाच-10 लाख रुपये भांडवल गुंतवणूक करणे सोपे नाही. हीच बाब लक्षात घेऊन शिवाजी झिंजाडे यांनी बुद्धिकौशल्यातून दुचाकीला छोटी ट्रॉली बनवून घेतली. या ट्रॉलीतून ते जनावरांसाठी घास, कडवळ, गिन्नी गवत वाहून आणतातच; परंतु शेतातील मका, ज्वारीचा कडबा शेतातून ते घरी घेऊन येतात. याशिवाय शेणखत ट्रॉलीत भरून शेतात टाकतात. करमाळा येथून रासायनिक खताच्या एकावेळी सात गोण्या ट्रॉलीत टाकून आणतात. 100 रुपयांचे पेट्रोल टाकले की शेतातील हजार रुपयांची कामे ते अगदी सहज करत आहेत. 

हेही वाचा : जाणून घ्या, सोलापूरात का येतोय सर्वाधिक कांदा 
बैलजोडी एवढी कामे 

बैलजोडी एवढी कामे ते दुचाकीद्वारे सहज करत आहेत. त्यामुळे त्यांचा बैलजोडी संभाळण्याचा त्रास वाचला व वाहन भाड्याने लावणे बंद झाले. यामुळे पैशांची बचत होऊन अर्थकारण सुधारण्यासाठी मदत झाली आहे. त्यांच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा हा प्रयोग इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's unique experiment (Video)