esakal | जाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा 
sakal

बोलून बातमी शोधा

Most onion sales in Solapur
  • खरेदीदार मोठ्या प्रमाणात 
  • 13 जिल्ह्यांतील 53 तालुक्‍यांचा कांदा सोलापुरात 
  • दररोज पाठवला जातो कांदा बाहेर 
  • पारदर्शक कारभारामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास 

जाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा 

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

सोलापूर : सध्या कांद्याच्या दराने विक्रम केला आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक कांदा हा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात कांद्याचा मोठ्या प्रमाणात लिलाव होणारी बाजार समिती म्हणून आता सोलापूर नावारूपास येऊ लागले आहे.

नाशिक, हिंगोली, नंदुरबारसह 13 जिल्ह्यांतील 54 तालुक्‍यांतून शेतकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणत आहेत. शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश येथूनही मोठ्या प्रमाणात येथे कांदा येत आहे. पण, येथे सर्वाधिक कांदा विक्रीसाठी का येत आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याची कारणेही तशीच आहेत, ती पुढीलप्रमाणे... 

हेही वाचा : अजित पवारांचा तो निर्णय कुटुंबात कोणालाही पटला नाही : शरद पवार 
व्यापारी संख्या... 

राज्यातील कांदा विक्री येणाऱ्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोलापूरचेही नाव आहे. सोलापूर हे राज्याच्या सीमेवर असून येथे दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी कांदा खरेदीसाठी येतात. मध्य रेल्वेच्या मार्गावर सोलापूर असल्याने येथून व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाहतूक खर्चात मोठी बचत होते. त्यामुळे सोलापुरात कांदा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी येतात. त्यांना सोईसुविधाही बाजार समितीमध्ये दिल्या जातात. 
शेतकऱ्यांचा विश्‍वास..
येथील बाजार समितीमध्ये रात्रीपासूनच शेतकरी कांदा घेऊन येतात. शासकीय सुटी वगळून दररोज येथे कांद्याचा लिलाव होतो. एकाच वेळी संपूर्ण बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव सुरू केला जातो. त्याचबरोबर लिलावावेळी बाजार समितीचा एक कर्मचारी उपस्थित असतो. येथे कोड सिस्टिम नाही, त्यामुळे आपला कांदा किती रुपयांनी विकला गेला, हे शेतकऱ्यांना समजते. त्यातून कांदा द्यायचा की नाही, हे शेतकऱ्याला ठरवता येते. काही ठिकाणी खरेदीदार हे ठराविक दर ठरवून लिलाव करतात; मात्र येथे तसे करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढलेला आहे. 
हेही वाचा : चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती सोहळा 
दर पडत नाहीत...
 
येथे दररोज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक आणि जावक होते. ज्या दिवशी कांद्याचा लिलाव झालेला आहे, त्याच दिवशी सर्व कांदा व्यापाऱ्याला घेऊन जावा लागतो. व्यापारी मोठ्या प्रमाणात येथे येत असल्याने एखाद्या दिवशी आवक वाढली तरी एकदम दर पडत नाहीत. सरासरी दर मिळत असल्याने त्यात शेतकऱ्यांचा तोटा होत नाही. काही ठिकाणी आवक वाढली की दर एकदम दर पडतात; मात्र येथे तसे होत नाही. 
येथून येतो सोलापुरात कांदा 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, नगर, नंदुरबार, धुळे, हिंगोली, परभणी, पुणे, लातूर यासह 13 जिल्ह्यांतून 54 तालुक्‍यांतील कांदा शेतकरी घेऊन विक्रीसाठी येतात. गेल्यावर्षी सरकारने कांदा विक्रीचे अनुदान दिले होते, तेव्हा बाजार समितीने अहवाल तयार केला होता. त्यावरून ही माहिती मिळाली असल्याचे बाजार समितीचे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले. 
हेही वाचा : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पहा कोण कुठे राहणार? 
कर्मचारी दर लिहून घेतात... 

बाजार समितीमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना लिलावावेळी एक भाव जाहीर होतो आणि प्रत्यक्षात मात्र दुसराच दर दिला जातो. परंतु, सोलापूर बाजार समितीमध्ये तसे होत नाही. जेव्हा लिलाव सुरू असतो, तेव्हा बाजार समितीचा एक कर्मचारी व्यापाऱ्याने किती भाव सांगितला याची नोंद ठेवतो. कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही तो माहिती होतो. जर शेतकऱ्याने तक्रार केली आणि लिलावातील एक भाव आणि दिलेला एक भाव असे झाले तर लिहून ठेवलेल्या माहितीचा आधार मिळतो. त्यामुळे गैरव्यवहार होत नाहीत. 
- मोहन निंबाळकर, 
सचिव, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती