बापरे.. मुलांनीच केला वडिलांचा खून! कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

घटना घडली तेव्हापासून दत्तात्रय चौगुलेची पत्नी व मुले फरार होते. त्यांचे मोबाईलही बंद होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी गावातून संशयितांना अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली.

सोलापूर : भंडारकवठे परिसरातील खुनाचा मंद्रूप पोलिसांनी 72 तासात उलगडा केला आहे. दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच कुऱ्हाड आणि विळ्याने वार करून खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. या गुन्ह्यात पत्नीसह मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. 

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

नदीपात्रात आढळला होता मृतदेह
दत्तात्रय सिद्धाराम चौगुले (वय 50, रा. वळसंग ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात दत्तात्रय चौगुलेची पत्नी सुनीता चौगुले (वय 45), मुलगा आतिष (वय 23) व अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पत्नी सुनीता आणि मुलगा आतिष या दोघांची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 9 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास भंडारकवठे गावाच्या परिसरात भीमा नदीवरील पुलाजवळ नदी पात्रामध्ये चौगुले याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस पाटील अशोक बसवंत मुक्काणे (वय 45, रा. भंडारकवठे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. मृताची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो आणि माहिती पोलिसांनी दक्षिण सोलापूर आणि इंडी तालुक्‍यातील विविध व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये मराठी आणि कन्नड भाषेत फॉरवर्ड केली होती. 

हेही वाचा - वादग्रस्त लेखकाच्या पुतळ्याला फासले काळे

खुनानंतर पत्नी आणि मुले झाली होते फरार
शुक्रवारी सकाळी इंडी तालुक्‍यातील निवर्गी येथील अनिलकुमार दांडेकर (वय 45) यांनी व्हॉट्‌स ऍपमध्ये फोटो पाहून मृत चौगुले यांना ओळखले. त्यांनी पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली होती. मृत चौगुले हा मूळचा वळसंगचा असून तो गेल्या सहा महिन्यांपासून उपजीविकेसाठी निवर्गीमध्ये शेतात कुटुंबासह सालगडी म्हणून काम करत होता अशी माहिती सांगण्यात आली. घटना घडली तेव्हापासून चौगुलेची पत्नी व मुले फरार होते. त्यांचे मोबाईलही बंद होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी गावातून संशयितांना अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखविताच सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली. मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलिस कर्मचारी आबा मुंडे, गोविंद राठोड, भरत चौधरी, अमोल पाटील, नवनाथ कोकरे, श्रीकांत भुरजे, महांतेश मुळजे, सुनंद स्वामी व सुतार यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला आहे. 

हेही वाचा - 'नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकरणी गुन्हा दाखल करा; पोलिसांकडे तक्रार

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
वडील दत्तात्रय चौगुले हे दारूच्या आहारी गेले होते. दारू पिऊन रोज आईशी भांडण करून तिला मारहाण करीत होते. घटनेच्या रात्रीही ते दारू पिऊन आईला मारहाण करत होते. या कारणावरून घरात भांडण झाले. रागाच्या भरात मी आणि माझ्या भावाने कुऱ्हाड, विळ्याने छातीवर, मानेवर वार करून वडिलांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला आणि रात्री दीड वाजता दुचाकीवरून भीमा नदीच्या बंधाऱ्यावर नेला. मृतदेहाला पाण्यात टाकून दिले. या घटनेनंतर आम्ही आईसह इस्लामपूर येथे पळून गेलो होतो, अशी कबुली आरोपी मुलगा आतिष चौगुले यांनी पोलिसांना दिली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father murdered at solapur