गुड न्यूज... शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी पाच लाख जमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

- शासनाकडून एक कोटी पाच लाख 21 हजार रुपये जमा

- पैकी 807 खातेदारांच्या खात्यावर 52 लाख रुपये जमा

- सध्या पंचनामे झालेल्यांना नुकसानभरपाई मिळणार 

सांगोला : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून एक कोटी पाच लाख 21 हजार रुपये तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 807 खातेदारांच्या खात्यावर 52 लाख रुपये जमा केल्याची माहिती तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिली. 

हे ही वाचा... भारतात इजिप्तवरून येणार कांदा

सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सांगोला तालुक्‍यातील तीन हजार 510 शेतकऱ्यांच्या एक हजार 956 हेक्‍टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी मंत्री, खासदार, आमदार व अनेक नेतेमंडळींनी केली होती. सरसकट नुकसान द्यावे, अशी मागणीही केली होती. परंतु तसे झाले नसून थोड्याफार शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे. शेती पिकांसाठी हेक्‍टरी आठ हजार व फळबागांना हेक्‍टरी 18 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून शेती पिकांसाठी 27 लाख हजार व फळबागांसाठी दोन कोटी 89 लाख 98 हजार रुपये असे एकूण तीन कोटी 196 लाख 99 हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षित होते. परंतु शासनाकडून एक कोटी पाच लाख 21 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. 

हे ही वाचा... चिखलठाणच्या शिक्षकाची सीडबॅंक देशविदेशात फेमस

सरसकट नुकसानभरपाई मिळावी 
सध्या पंचनामे झालेल्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. सततच्या पावसाने अद्यापही डाळिंबाची फुलगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. नवीन कळीही बागांना निघत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु अशा बागांचे पंचनामे झाले नाहीत. लवकरच नवीन सरकार स्थापन होणार असून नवीन सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news... To help farmers One crore five lakh deposits