खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

तात्या लांडगे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- 4 ते 6 डिसेंबरला केगाव येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रात होणार कार्यशाळा
- बदलत्या हवामानाचा पिकांवरील परिणाम अन्‌ उपायांवर होणार चर्चा
- हैदराबाद येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. जी. रविंद्र चारी यांची उपस्थिती
- राज्यातील 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ उपस्थित राहणार

सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र येथे 4 ते 6 या काळात भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद आणि अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प सोलापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने कृषी हवामानशास्त्राच्या संशोधकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, केगाव येथील सभागृहात 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे.

वाळूमाफियांनी घातला अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर

भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था हैदराबाद येथील संचालक डॉ. जी. रविंद्र चारी, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे सहायक महासंचालक डॉ. एस. भास्कर, डॉ. शरद गडाख, डॉ. पी. विजयकुमार आदींची उपस्थिती राहणार आहे. राज्यातील 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. भारतातील बदलते हवामान, त्याचा पिकांवरील परिणाम, त्यासाठीच्या उपाययोजना या विषयांवर तीन दिवस विचारमंथन होणार आहे. सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय अमृतसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. हणुमंत घाडगे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

लई भारी ! महापौर-उपमहापौर उमेदवारी अर्जात 'या' महापालिकेचा विक्रम

बळीराजासाठी ठोस उपायांचा शोध
राज्यातील 100 कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत देशातील हवामान बदल अन्‌ पिकांवरील होणाऱ्या परिणामावर चर्चा करुन ठोस उपाय शोधणार आहेत. त्यानुसार पिकपध्दती कशी असावी, कोणत्या हवामानात कोणती पिके घ्यावीत, पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत आगामी काळात शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे. जेणेकरुन शेती पिकांचे नुकसान टाळता येईल, असे उपाय या कार्यशाळेतून अपेक्षित आहेत.
-
कार्यशाळेचा हा आहे प्रमुख उद्देश...
देशातील हवामान सातत्याने बदलत असून दुष्काळ, गारपीट, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक संकटांना शेतकरी सामोरे जात आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च करुनही त्यांच्या हाती काहीच लागत नाही. या पार्श्‍वभूमीवर बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावी, लागवड केलेल्या पिकांची काळजी कशी घ्यावी, कोणते उपाय करता येतील, बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज कसा घेता येईल, या प्रमुख मुद्‌द्‌यांवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The good news ...! There will be 100 agro-climate scientists in this city