वाळूमाफियांनी घातला अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न

- दमदाटी व शिवीगाळ केली

- सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी ते जत रस्त्यावर घडली घटना

- सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

सांगोला (सोलापूर) : तुम्हाला काय करायचे ते करा, मला परत कोण अडवतो तेच बघतो असे म्हणत वाळूमाफियांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न करीत दमदाटी व शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी (ता. 30) सकाळी सातच्या सुमारास आगलावेवाडी ते जत रस्त्यावर घडली. 

हे ही वाचा... पंढरपुरात विष्णूपदावर अर्धा फूट पाणी

शनिवारी (ता. 30) सकाळी सातच्या सुमारास तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या आदेशानुसार अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जवळा मंडलचे मंडलाधिकारी दत्तात्रय कांबळे, हातीद मंडलचे मंडलाधिकारी धनंजय इंगोले, जवळाचे तलाठी संभाजी जाधव हे दुचाकीवरून निघाले होते. कोरडा नदीपात्रात ट्रॅक्‍टरमध्ये चोरून वाळू भरून घेऊन चाललेले आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार मंडलाधिकारी व तलाठी आगलावेवाडी ते जत रस्त्याने जात असताना माने वस्ती समोर विना क्रमांकाचा ट्रॅक्‍टर वाळू भरून घेऊन जात असताना दिसला. या वेळी दुचाकी आडव्या लावून ट्रॅक्‍टर थांबविण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु ट्रॅक्‍टरचालक चंद्रकांत वसंत गवंड याने कांबळे यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा... लई भारी ! महापौर-उपमहापौर उमेदवारी अर्जांचा "या" महापालिकेत विक्रम

मंडलाधिकारी कांबळे यांनी ट्रॅक्‍टर चालक चंद्रकांत गवंड याच्याकडे वाळू वाहनाचा परवाना आहे का असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या वेळी ट्रॅक्‍टर सांगोला येथील तहसील कार्यालयाकडे घेऊन चल असे सांगितल्यानंतर ट्रॅक्‍टरमध्ये असणारे सुरेश वसंत गवंड व नंदकुमार विठ्ठल वगरे (दोघे रा. बुरंगेवाडी, ता. सांगोला) यांनी मंडलाधिकारी कांबळे यांना शिवीगाळ करून मी तहसील कार्यालयात ट्रॅक्‍टर घेऊन जाऊ देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. मला परत कोण अडवतो तेच बघतो अशी दमदाटी केली. दरम्यान चंद्रकांत गवंड हा वाळू भरलेला ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेला. 

हे ही वाचा... थरार.... द बर्निंग ट्रक

याबाबत मंडलाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टर चालक चंद्रकांत वसंत गवंड, सुरेश वसंत गवंड, नंदकुमार विठ्ठल वगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वसगडे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor on the premises of Valumafiduela officers