पानसरे हत्या प्रकरणातील संशयितांची 'या' तपासासाठी वाढवली कोठडी

पानसरे हत्या प्रकरणातील  संशयितांची 'या' तपासासाठी वाढवली कोठडी

कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या कटातील तीनही संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज वीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी ही कोठडी सुनावली. 

या चाैकशीसाठी वाढवली कोठडी

संशयित आरोपींनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन - अडीच तासांच्या एस. टी. प्रवासानंतर जंगल व्याप्त भागात दोन दिवस एअर पिस्टलने टारगेटवर फायरिंगचा सराव केला आहे. यावेळी अमल काळे, सचिन अंदुरे व इतर तीन अनोळखी व्यक्ती होत्या. त्यांचा तपास करायचा आहे. तसेच बेळगाव येथे "पाईप बॉम्ब'चे प्रात्यक्षिक घेतले आहे. त्याची माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी आज न्यायालयात केली. यावर या तिघांना पुन्हा चार दिवसांची कोठडी वाढवण्यात आली.

पोलिस कोठडीसाठी मांडलेले महत्वाचे मुद्दे 

  • एक लेखक व इतर दोन पुरोगामी व्यक्तींची रेकी करण्यासाठी कोल्हापुरात बैठक झाली होती. त्याचे नेमके ठिकाण ते संशयित आरोपी सांगत नाहीत. त्या व्यक्तींचे त्रोटक वर्णन सांगतात. त्याचा अधिक तपास करायचा आहे.
  • अमोल काळे आणि अंदुरे कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या परिसरात फिरले. मात्र रेकी करण्यासाठी कोठे गेले होते हे सांगत नाहीत. त्याचाही तपास करायचा आहे.
  • कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून दोन ते अडीच तासांच्या एस. टी. प्रवासानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एका जंगलव्याप्त भागाजवळ असलेल्या गावात आरोपी गेले होते. त्या ठिकाणी काळे, अंदुरे आणि अन्य तीन व्यक्ती होत्या. त्यांनी दोन दिवस जंगलातील शेडमध्ये एअर पिस्टलने टारगेटवर फायरिंगचा सराव केला. या तपासातीली माहितीला अंदुरेने दुजोरा दिला आहे. निश्‍चित कोणत्या ठिकाणी फायरिंगचा सराव केला. त्या कालावधीत ते कोठे राहिले. हे आठवत नसल्याचे तो सांगतो. अंदुरे भौगोलीक परिस्थिती थोडीफार सांगत आहे. त्याला सोबत घेवून या ठिकाणाचा शोध घ्यायचा आहे. तेथील साक्षीदार आणि पुरावा निश्‍चित करायचा आहे. 
  • पानसरे हत्येच्या गुन्ह्याच्या काही दिवसापूर्वी हुबळी (कर्नाटक) येथे अंदुरे, बद्दी, मिस्किन आणि वासुदेव सुर्यंवंशी यांनी पिस्टल फायरिंगचा सराव केला. अंदुरे याने त्यांच्या सोबत सात राऊंड आणले होते. मिस्कीन याच्याकडील पिस्टलमधून सुर्यवंशी याने एक राऊंड फायर केल्याची माहिती पुढे आली आहे. हे पिस्टल कोणते होते याचीही माहिती घ्यायची आहे.
  • अमित बद्दी, गणेश मिस्कीन यांच्याकडे चौकशी दरम्यान सुर्यवंशी व अंदुरे हे हुबळी येथे भेटल्याचे मान्य केले आहे. अधिक तपासासाठी त्यांना सोबत घेवून हुबळी येथे जायचे आहे.
  • बद्दी याचे व्यवसायाच्या निमित्ताने वारंवार कोल्हापुरातील नातेवाईकांकडे येणे होते. त्याने वास्तव्यास दुजारो दिला आहे मात्र गुन्ह्याच्या अनुशंगाने कोणाकोणाला भेटला याची माहिती सांगत नाही. गुन्ह्यातील फरारी आरोपी विनय पवार व सारंग अकोळकर यांच्या सध्याच्या ठावठिकाणाबाबत काहीच माहिती सांगत नाही. त्याचाही तपास करायचा आहे.

आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी याला आक्षेप घेतला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दहा दिवस पोलिस कोठडीत पोलिसांनी काय केले? असा सवाल करीत आता खटला सुरू करावा, अशी मागणी आरोपींच्या वकीलांनी केली. वेगवगेळ्या व्यक्तींना या आरोपाखाली अटक केली जात आहे. त्यांच्याकडून काहीच निष्पन्न होत नाही. तरीही वारंवार कोठडीची मागणी केली जात आहे. गेली चार वर्षे हेच सुरू आहे. आता ट्रायल सुरू करावी, आरोपी वाढले तर ते पुरवणी यादीतून सादर करावेत, असे आमचे म्हणणे आहे. असेही ते म्हणाले. दहा दिवसानंतर पोलिस कोठडीची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद विचारात घेऊन वीस सप्टेंबरपर्यंत तिन्ही संशयीत आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com