"सकाळ', "ऍग्रोवन'मुळे बळीराजाला पुण्यातून मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

"ऍग्रोवन', "सकाळ'चे खरोखर खूप आभारी आहोत. आपल्यामुळे पुण्यातील साहेबांनी आम्हाला मोठी मदत केली. यापुढेही मी मदत करेन असे त्यांनी सांगितले आहे. खरोखरच गरिबांना मदत करणारा तो खरा देवमाणूच होता. 
- यशवंत खंडागळे, नुकसानग्रस्त शेतकरी, संगेवाडी

सांगोला (जि. सोलापूर) : अतिवृष्टीमुळे दोन महिन्यांपूर्वी राज्यात शेती क्षेत्राला जबर फटका बसला. त्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. डाळिंबाचा आगार असलेला सांगोला तालुकाही त्यातून सुटला नाही. याच तालुक्‍यातील संगेवाडीतील यशवंत खंडागळे या शेतकऱ्याची प्रातिनिधिक व्यथा "कळ्या अन्‌ फुलंच न्हाई, तर पावसानं आमचं नशीब बी झोडून नेलं' अशा मथळ्याखाली "सकाळ' आणि "ऍग्रोवन'च्या 21 नोव्हेंबरच्या अंकामध्ये "अवकाळीच्या कळा' या सदरात मांडण्यात आली. या स्टोरीतील खंडागळे कुटुंबीयांची व्यथा वाचून पुणे येथील उद्योजक प्रशांत बिराजदार यांनी सोमवारी (ता. 2) संगेवाडीत येऊन शेतकरी यशवंत खंडागळे यांना रोख 23 हजार 11 रुपयांची आर्थिक मदत तर दिलीच, पण त्यांच्या पत्नीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी साह्य करण्याचे तसेच मुलाच्या नोकरीसाठीही प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देत औदार्य दाखवले. 

हेही वाचा : पोथरेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग 

बिराजदार यांच्या या दातृत्वाने खंडागळे कुटुंबीय भारावून गेले. अनपेक्षितपणे त्यांना या संकटसमयी मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर उमटलेच, पण "सकाळ' आणि "ऍग्रोवन'चे खासकरून त्यांनी आभार मानले आहेत. यशवंत खंडागळे यांची हलाखीची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यात अतिपावसाने मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागेत झालेल्या फुलगळतीने उत्पन्नाचा हमखास मार्ग तर संपलाच, पण नव्याने उभारण्यासाठी त्यांची ताकद कमी पडणार होती. त्यातच खंडागळे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचे व पत्नीच्या दवाखान्याचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा होता. मोलमजुरी करूनही कुटुंबाचा फक्त उदरनिर्वाहच होत असल्याने डाळिंबीच्या झालेल्या नुकसानीचा मोठा आघात भरून निघणे अवघड होते. शिवाय बॅंक आणि उसनावारीचे कर्ज डोक्‍यावर, या सर्व परिस्थितीचे वार्तांकन या स्टोरीमध्ये करण्यात आली होते, श्री. बिराजदार हेही शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे, खंडागळे कुटुंबाची ही व्यथा वाचून त्यांनी काय मदत करता येईल, याचा विचार केला आणि थेट त्यांच्या घरापर्यंत जात ही मदत केली. 

हेही वाचा : सोलापूर केंद्रातून चकोट घास प्रथम 

याबाबत श्री. बिराजदार म्हणाले, ""माझ्या मदतीमुळे त्यांना फार मदत होईल, असे नाही. पण थोडासा आधार द्यावा, शक्‍य आहे ते करावे, या भावनेने मी ही मदत केली. यापुढेही त्यांच्या पत्नीच्या डोळ्याचे ऑपरेशन व मुलाच्या नोकरीसाठी शक्‍य ती मदत करू. कोणतीही अडचण येऊ द्या, मला फोन करा, अशा सूचनाही त्यांनी खंडागळे कुटुंबीयांना केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hands of help to the farmer