SUNDAY SPECIAL : चाकू, सुऱ्याबरोबर मुलांच्या "करियर'ला धार देणाऱ्या ताराबाई 

SUNDAY SPECIAL : चाकू, सुऱ्याबरोबर मुलांच्या "करियर'ला धार देणाऱ्या ताराबाई 

सोलापूर  : येथील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात चाकू, सुऱ्यांना धार लावता-लावताच आपल्या मुला- मुलींना घडविण्यासाठी संघर्ष करीत त्यांच्या "करियर'ला धार लावण्याचे काम   श्रीमती ताराबाई गोविंदराव कांबळे ऊर्फ जीजी यांनी केले आहे. आज सर्व मुले विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठ्या पदावर काम करीत करीत आहेत, त्यांच्या पतींचेही निधन झाले. तरीसुद्धा ताराबाईंनी आपला व्यवसाय सोडलेला नाही. गेल्या पन्नास वर्षांपासून ताराबाई पतीसह मंगळवार बाजारात एकाच जागेवर बसून त्या चाकू, सुरे, कात्री, अडकित्ते, खुरप्यांना धार लावण्यासह त्यांची विक्री करण्याचे काम करीत आहेत. 

पतीच्या व्यवसायात घेतला सहभाग 
वयाच्या तेराव्या वर्षी लग्न झाल्यावर, त्या सोलापुरात आल्या. जुन्या कात्री व इतर शस्त्रांना धार लावण्याचा त्यांच्या पतीचा व्यवसाय. पूर्वी लाकडाची जुनी गाडी खांद्यावर घेऊन ते शहरभर फिरत. काही कालावधीनंतर सायकलवर ग्रॅंडर बसवून हा व्यवसाय सुरू केला. लोकांच्या जुन्या-पुराण्या कात्रींना धार लावतानाच सहाही मुलांच्या करियरला धार लावण्याचे काम या पती-पत्नीने केले. त्यामुळे सर्वजणांनी पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतले. थोरला मुलगा सहकार खात्यातून पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाला. कांबळे दांपत्यांनी उर्वरित मुलांचे करिअर घडविले. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा महापालिकेत जनसंपर्क अधिकारी पदावर आहे. तीन मुली मूकबधिर शाळेत शिक्षिका आहेत, एक मुलगी पोलिस खात्यात आहे. 


आर्थिक सुबत्ता आली तरी, व्यवसाय सोडला नाही 
आर्थिक सुबत्ता आली तरी, ताराबाईंनी मंगळवार बाजारात व्यवसायासाठी जाणे सोडलेले नाही. माणसाने नेहमी उद्योगी राहिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. मंगळवार बाजारासह पंढरपूरला भरणाऱ्या चारही वाऱ्यांना त्या आवर्जून हजेरी लावतात. वय झाल्याने त्यांनी पंढरपूरला जाऊ नये, असे मुलांचे मत आहे. मात्र, वारीदरम्यान, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून येणाऱ्या जुन्या ग्राहकांची अडचण होईल, असे त्या सांगतात. 

दोन आण्याची जागा घेतली वीस रुपयांनी 
उन्हाळा, पावसाळा असो वा हिवाळा प्रत्येक मंगळवारी सकाळी सात वाजता त्या मंगळवार बाजारातील जुन्या वस्तू विकल्या जाणाऱ्या ठिकाणी पोचतात व दिवसभर बसून कार्यरत राहतात. स्टेनलेस स्टीलच्या जमान्यात जुन्या पद्धतीच्या चाकू, सुऱ्यांना मागणी कमी असली तरी, गुणवत्तेच्या दृष्टीने तीच हत्यारे योग्य आहेत. त्यामुळे जे लोक व्यवसायासाठी या हत्यारांचा सातत्याने वापर करतात, ते धार लावण्यासाठी आमच्याकडेच येतात. एखाद्या मंगळवारी थोडासा उशीर झाला तरी, आमची वाट पाहात उभे राहतात. अगदी सुरवातीला एक आणा व दोन आणे धार लावण्यासाठी घेत होतो, आता दहा ते वीस रुपये घेतो, असे त्यांनी सांगितले. 

श्रीमती कांबळे यांची कर्तृत्ववान मुले 
लक्ष्मण कांबळे  : जिल्हा उपनिबंधक कार्यालय, पर्यवेक्षक 
अर्जुन कांबळे : तहसीलदार 
विजयकुमार कांबळे : जनसंपर्क अधिकारी 
कस्तुर मस्के, शोभा रणदिवे, अनिता वाघमारे : तिघीही शिक्षिका 
पुष्पा कांबळे  : पोलिस निरीक्षक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com