ग्रामपंचायती होणार मालामाल...कारण!

ग्रामपंचायती होणार मालामाल...कारण!

सोलापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या उपकर व फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी घेतला आहे. या उपकर व फी वाढीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती आवश्‍यक असून ही दुरुस्ती करण्यासाठी ग्रामविकास विभागाने अधिसूचनेद्वारे मसुदा प्रसिद्ध केला आहे. हा मसुदा 14 डिसेंबर रोजी निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक यात्रेकरूंसाठी किमान पाच रुपये कर आकारला जातो. हा कर कमाल 20 रुपये करण्यात आला आहे. यात्रा उत्सवांवरील उपकरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. करमणुकीसाठी घेतलेल्या प्रत्येक 100 चौरस मीटर जागेचा सध्या प्रत्येक दिवसाला 75 रुपये उपकर असून हा उपकर आता 125 रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. करमणुकीच्या खेळावरील करांमध्येही वाढ करण्यात आली असून प्रदर्शन, मनोरंजन, खेळ किंवा क्रीडासाठी प्रत्येक दिवसाला 200 रुपये आकारले जातात, हा उपकर आता 500 रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. नाटक, सर्कस किंवा सिनेमासाठी सध्या प्रत्येक खेळाला 10 रुपये आकारले जात असून आता प्रत्येक खेळाला 200 रुपयांपर्यंत आकारणी होणार आहे. 
याशिवाय सामान्य आरोग्य रक्षण उपकर, सामान्य पाणीपट्टी, बाजार आणि आठवडे बाजार यावरील फीमध्ये देखील वाढ सुचविण्यात आली आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी सध्या दोन रुपये, पाच रुपये, 10 रुपये व 20 रुपये 24 तासांसाठी आकारले जातात. या दरांमध्ये वाढ करून 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये आणि 80 रुपये असे कमाल दर निश्‍चित केले आहेत. मीटरपद्धती व्यतिरिक्त इतर पद्धतीने पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दर, मीटर पद्धतीने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरातही वाढ सुचविण्यात आली आहे. विशेष स्वच्छताविषयक उपकर, दिवाबत्ती कर यामध्ये सुधारणा सुचविण्यात आली आहे. या सुधारित उपकर व फीमुळे राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या मालामाल होणार आहेत. 

जिल्हास्तरावर असणार समिती 
संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषद स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा जिल्हास्तरीय प्रतिनिधी, वन विभागाचा जिल्हास्तरीय प्रतिनिधी, पुरातत्त्व संचालनालयाचा विभाग/जिल्हास्तरीय प्रतिनिधी, प्रांताधिकारी, नगररचना संचालनालयाचा जिल्हास्तरीय प्रतिनिधी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com