माध्यमिक, वेतनपथक कार्यालयास "नरकयातना' 

दौलत झावरे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जुन्या इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमिक व वेतनपथक कार्यालयाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या इमारतीत स्वच्छता फक्त नावालाच आहे. या कार्यालयाच्या इमारतीचा जिना अस्वच्छतेचे माहेरघर आहे.

नगर ः जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी भेटी देऊन तेथील शाळांची स्वच्छता व शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आहे की नाही, याची पाहणी माध्यमिक शिक्षण विभागातर्फे केली जाते. मात्र, या शिक्षण विभागालाच जिल्ह्यातील शाळांचा कारभार दुर्गंधीयुक्त वातावरणात बसून करावा लागत आहे. 

जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये नगर पंचायत समितीची जुनी इमारत आहे. नगर पंचायत समितीचे स्थलांतर नवीन वास्तूत झाले. त्यानंतर या जुन्या इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमिक व वेतनपथक कार्यालयाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या इमारतीत स्वच्छता फक्त नावालाच आहे. या कार्यालयाच्या इमारतीचा जिना अस्वच्छतेचे माहेरघर आहे. भिंती आगंतुकांनी मावा- तंबाखूच्या पिंक मारून रंगविल्या आहेत. या इमारतीतील स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. मात्र, त्याची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अस्वच्छ वातावरणात कामकाज करावे लागत आहे. 

तक्रारींना केराची टोपली 
या दुर्गंधीयुक्त वातावरणातच या तिन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांसह कर्मचारी सकाळी दहा ते रात्री सहा वाजेपर्यंत आपले काम इमानेइतबारे पार पाडत आहेत. कामकाजाबरोबर दुपारचे जेवणही तेथेच करावे लागते. विशेष म्हणजे येथील तिन्ही कार्यालयांनी याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली होती. मात्र, त्यात अद्यापि दुरुस्ती झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीलाही जिल्हा परिषदेने केराची टोपली दाखविली. 

"अंतर्गत वातावरणही पाहा' 
जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी कणखर भूमिका घेतली आहे. तशी भूमिका जिल्हा परिषदेच्या अंतर्गत स्वच्छतेबाबत घ्यावी, अशी मागणी आता कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा ः  "त्या'वरच "आयुष'ची उभारणी 

वारंवार पत्रव्यवहार ः थोरे 
दुर्गंधीबाबत आपल्या कार्यालयाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना नाक मुठीत धरून काम करावे लागते. 
- दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

हेही वाचा ः न्यायासाठी गुरुजींची आयुक्तांकडे धाव... 

पोर्च हटला ढिगारा तसाच 
नगर पंचायत समितीच्या इमारतीसमोर असलेला धोकादायक पोर्च हटविण्यात आलेला आहे. परंतु त्या पोर्चचा निघालेला विटा व वाळूचा ढिगारा तसाच या परिसरात पडून आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeopardizing the health of employees