कोल्हापूरहून मुंबईला जाणारे विमान का करावे लागले रद्द ?

Kolhapur to Mumbai Flight Canceled Due To Bad Light
Kolhapur to Mumbai Flight Canceled Due To Bad Light

कोल्हापूर - येथील विमानतळावर ‘नाइट लॅंडिंग’ची सुविधा नसल्याने  कोल्हापूरहून मुंबईला जाणारे विमान रद्द करण्याची वेळ आली. नियमित वेळेपेक्षा उशिरा आलेल्या या विमानाचे उड्डाण अंधूक सूर्यप्रकाशामुळे रद्द करून थांबवण्यात आले. या विमानातून सुमारे २५ प्रवासी मुंबईला जाणार होते. यांतील काही प्रवाशांनी या प्रकाराबद्दल विमानतळ अधिकाऱ्यांना जाब विचारून गोंधळ घातल्याचे समजते. 

विमानसेवा सुरू झाल्यानंतरचा हा दुसरा प्रकार आहे. अगोदरच मुंबईहून हे विमान तब्बल चार तास उशिरा आले, त्यामुळे या विमानाच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी संतापले होते, त्यात विमानच रद्द झाल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही प्रवाशांनी पर्यायी मागाने मुंबई गाठली; तर काहींनी प्रवासाचा बेतच रद्द केला. आज सकाळी साडेनऊनंतर हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. आजच्या विमानातून विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारीही मुंबईला जाणार होते; पण त्यांना याच विमानसेवा रद्दचा फटका बसला. 

मुंबईत एकाच धावपट्टीवरून उड्डाण

कोल्हापूरहून रोज तिरुपती, हैदराबाद आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. मुंबईला जाण्यासाठीचे विमान दुपारी दीडच्या सुमारास येते व २० मिनिटांत परत जाते; पण मुंबई विमानतळावरील दोन धावपट्टींचे काम सुरू आहे, त्यामुळे एकाच धावपट्टीवरून विमानांचे उड्डाण सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरला येणारे विमान सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी कोल्हापुरात आले. तब्बल चार तास उशिरा हे विमान कोल्हापुरात आले, तोपर्यंत विमानाच्या प्रतीक्षेत मुंबईला जाणारे प्रवासी विमानतळावरच थांबून होते. त्यातून आलेले प्रवासी उतरून मुंबईला जाणारे प्रवासी विमानात चढण्यास उशीर झाला. यात सायंकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे झाली. तोपर्यंत सूर्यप्रकाशही कमी होऊन विमानतळावर अंधार पसरल्याने पायलटने विमान उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली. अखेर विमानतळ प्राधिकरण व ‘एटीसी’च्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून विमानाचे उड्डाणच रद्द करण्यात आले. 

प्रवासी संतप्त

अचानक विमान रद्द झाल्याने दुपारपासून विमानाच्या प्रतीक्षेत थांबलेले व मुंबईला जाणारे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याचा जाब स्थानिक प्रशासनाला विचारला, त्यातून काही काळ विमानतळावर गोंधळ झाला. काही प्रवासी व अधिकारी यांच्यात अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाल्याचे समजते. 

तीन प्रवाशांमुळे विलंब

या विमानातून व्हीलचेअरने प्रवास करणारे तीन प्रवासी होते. त्यांना व्हीलचेअरसह विमानात बसवण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे विमान उड्डाणास उशीर झाल्याचे समजते. 

केवळ घोषणाच

‘नाइट लॅंडिंग’ची सुविधा सुरू करण्याच्या घोषणा अनेकदा झाल्या. प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे; पण काही कारणांनी त्याला विलंब होत गेला. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले. यावरून काही प्रवासी संतप्त झाले, तर काहींनी आपला प्रवास रद्द केला. काही प्रवासी पर्यायी व्यवस्था करून मुंबईला गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com